Cyber Crime : परताव्याच्या आमिषाने सायबर चोरांकडून ‘लूटमार’

सायबर चोरांकडून नागरिकांची दररोज लाखोंची फसवणूक.
Cyber Crime
Cyber Crimeesakal

पुणे - शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास, तर कधी ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची ‘ऑनलाइन लूटमार’ करण्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी करूनही नागरिक सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडत आहेत.

अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर पाठविलेली लिंक किंवा संदेश क्लिक करू नका. अल्पावधीच्या गुंतवणुकीवर कोणी दुप्पट-तिप्पट परतावा देत नाही. त्यामुळे जादा पैशांच्या मोहाला बळी पडू नका. पूर्ण माहिती घेऊन खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी विमाननगर परिसरातील एका ६८ वर्षीय महिलेची १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी जय सहानी या नावाने महिलेशी संपर्क साधला.

गोल्ड मॅन सॅचेस या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बॅंक खात्यात १३ लाख ५० हजार रुपये जमा केले. परंतु परतावा दिला नाही. पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करीत आहेत.

शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी धायरीतील एका व्यक्तीची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ४२ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देतो, असे सांगून टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवली. त्यानंतर पाच ते सहा सायबर चोरट्यांनी फिर्यादीला बॅंक खात्यात पैसे भरण्यास सांगून फसवणूक केली.

संकेतस्थळावरील जाहिरातींना ऑनलाइन रिव्ह्यू आणि रेटिंग दिल्यास चांगले पैसे देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी खराडीतील एका महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने सात लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु कोणताही परतावा दिला नाही. पोलिस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड तपास करीत आहेत.

गुंतवणुकीवर भरघोस नफा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सहा लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत वडगावशेरीतील एका ५५ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुंतवणुकीवर दुप्पट नफा देण्याचे आमिष दाखवले. त्यावर फिर्यादीने चोरट्यांच्या बॅंक खात्यात सहा लाख २४ हजार रुपये जमा केले. परंतु कोणताही परतावा मिळाला नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com