कुलूपाची चावी खिडकीत ठेवणे पडले महागात; झालं असं...

जनार्दन दांडगे
बुधवार, 15 जानेवारी 2020

चोरटा ओळखीतलाच

लोणी काळभोर : घराबाहेर पडताना एकमेकांची सोय व्हावी, यासाठी घराच्या कुलूपाची चावी खिडकीत लपवून ठेवणे ही सवय कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीमाळवाडी येथील कदम कुटुबांला चांगलीच महागात पडली आहे. खिडकीत ठेवलेल्या चावीचा वापर करुन अज्ञात चोरट्याने कदम यांच्या घरातील 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 7 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास उघडकीस आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खिडकीत ठेवलेल्या चावीचा वापर करुन चोरट्यांनी सागर बाळासाहेब कदम (वय- 31, रा. माळवाडी, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांच्या घरात डल्ला मारला असून, सागर कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कदम हे हडपसर येथील एका खाजगी कंपनीत कामाला असून, ते आई मीना व वडील बाळासाहेब यांच्या समवेत कवडीमाळवाडी येथे राहतात. सागर मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला निघून गेले होते. सागर कामावर निघून गेल्यानंतर सागरचे आईवडीलही नेहमीप्रमाणे घर बंद करुन शेतातील कामासाठी घराबाहेर पडले.

घर बंद केल्यानंतर सवयीप्रमाने सागर यांच्या आईने कुलूपाची चावी खिडकीत ठेवली व खिडकी लावून घेतली. खिडकीतील चावीवर लक्ष ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्याने खिडकीत लपवून ठेवलेल्या चावीचा वापर करुन सागर याच्या घरातील कपाटातील तीन सोन्याचे गंठन, अंगठ्या, सोन्याचे मनी असे सतरा तोळे वजनाचे दागिने व रोख पंधरा हजार रुपये असा ऐवज लंपास केला. शेतातील काम संपवून सागरचे आईवडील सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

चोरटा ओळखीतलाच

सागर कदम व त्यांचे कुंटुबीय घराबाहेर पडताना घराची चावी खिडकीत ठेवतात ही बाब हेरुन सोन्याचे दागिने व कपाटातील रोख रकमेची चोरी करण्यात आलेली आहे. चोरटा हा जवळचाच असून, चोरट्यासंदर्भातील काही धागेदोरे हाती लागले आहेत. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व त्यांचे पथक या प्रकरणाचा बारकाईने तपास करीत आहे. या प्रकरणातील चोरटा लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, असे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in Loni Kalbhor Pune