'आमच्या उद्धवला सांभाळा! असे बाळासाहेब का म्हणाले होते ते कळाले'

रविवार, 28 ऑक्टोबर 2018

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या अखेरच्या क्षणी म्हणाले होते की, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्याचे कारण खरे तर काल समजले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे

पुणे- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या अखेरच्या क्षणी म्हणाले होते की, आमच्या उद्धवला सांभाळा ! त्याचे कारण खरे तर काल समजले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे

त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, बाळासाहेबांना जाताना म्हणायचे होते की, आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या. बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टिका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला असल्याची टीकादेखिल रोहित पवार यांनी केली आहे.

तसेच, उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचे देखील साधं कष्ट त्यांनी घेतले नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या बुधवारी जालन्यात एका कार्यक्रमादरम्यान टीका केली होती. पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार असा सवाल अजित पवार यांनी केला होता. यानंतर 'सामना'च्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar criticise On Udhhav Thackrey