‘रोझलॅंड’ ठरतेय पिकनिक डेस्टिनेशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

पिंपरी - ‘पिकनिक डेस्टिनेशन’ म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्थळांची नावे घेता येतील. विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणूनही या शहराकडे बघितले जाते. त्यात आता पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीची भर पडली आहे. पक्षिसंवर्धन उपक्रम, कचरा वर्गीकरण, पाणी व्यवस्थापन, वीज बचत आणि जैव खत प्रकल्पामुळे सबंध महाराष्ट्राचे डोळे या सोसायटीकडे लागले आहेत. ‘प्रोजेक्‍ट डेस्टिनेशन’ म्हणूनही ही सोसायटी राज्यभरात लोकप्रिय ठरत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील शंकरलाल खिंवसरा महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांसह जवळपास १७ कर्मचाऱ्यांनी रोझलॅंड सोसायटीला नुकतीच भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सोसायटीने स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या विविध उपक्रम व प्रकल्पांची पाहणी केली. पर्यावरण संरक्षण व संवर्धन मोहिमेमुळे अमरावती महापालिकेचे ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर’ नंदकिशोर गांधी यांचाही त्यामध्ये समावेश होता. 

चिमणी संवर्धनासाठी सोसायटीने राबविलेल्या उपक्रमाचे संपूर्ण पथकाने भरभरून कौतुक केले. तसेच सोसायटीतील झाडांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर उभारण्यात आलेला खतनिर्मिती प्रकल्प त्यांच्या पसंतीस उतरला. त्या व्यतिरिक्तही ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम पाहून सर्वच प्रभावित झाले. 

‘‘स्वयंस्फूर्तीने एकाच वेळी विविध प्रकारचे उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच सोसायटी असावी,’’ असे मत गांधी यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच या सर्व प्रकल्पांचे डॉक्‍युमेंटेशन आणि प्रेझेंटेशन करण्यात यावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. 

पर्यावरण, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी आतापर्यंत सोसायटीला भेट देऊन, येथील उपक्रमांची पाहणी केली आहे. सोसायटीला वीज बचतीसंदर्भातील राज्यस्तरीय पारितोषिकही प्राप्त झाले आहे. तर त्यांच्या चिमणी संवर्धन उपक्रमाची दखल देशपातळीवरील एका संस्थेने घेऊन पुरस्कारही देऊ केला आहे. मात्र, केवळ उपक्रम पाहण्यासाठी पहिल्यांदाच इतक्‍या दूरवरून पथक आले असल्याचे मस्कर यांनी सांगितले. 

रोझलॅंड सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर, म्हणाले, ‘‘गांधी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार या सर्व उपक्रमांवर आधारित पाच मिनिटांचा माहितीपट तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा माहितीपट सादर केला जाईल. तसेच फेसबुक, व्हॉटसॲपसारख्या सोशल साईटवरून त्याचा प्रचार केला जाईल. जेणेकरून अन्य सोसायट्यांना त्यातून प्रेरणा मिळेल.’’ 

Web Title: roseland picnic destination