निवडणुकांबाबत नेते महादेव जानकर यांनी केली मोठी घोषणा

निवडणुकांबाबत नेते महादेव जानकर यांनी केली मोठी घोषणा

बारामती : नवीन कृषी कायद्यांनंतरही शेती मालाची आधारभूत किंमत, हमीभाव, बाजार समित्यांचे अस्तित्व जैसे थे राहाणार असल्याची हमी केंद्र सरकारने दिल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) चा घटकपक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थनच करीत असल्याचे प्रतिपादन रासपचे संस्थापक महादेव जानकर यांनी केले. 

रासप यापुढेही रालोआचा घटकपक्ष राहणार आहे, मात्र यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका रासप स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्त्यांनी स्थानिक प्रश्नांवर जनतेचा आवाज व्हावे, असे आवाहन जानकर यांनी केले. बारामतीत  प्रमुख पदाधिकारी, विविध प्रभारी व निवडक कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत जानकर बोलत होते. 

अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय संघटक पंडीतराव घोळवे होते. जानकर म्हणाले, मोदी विरोधक काही संघटनांच्या आडून नवीन कृषी विधेयकांबद्दल शेतकरी वर्गात भ्रम पसरविण्याचे काम करीत आहेत. कॉग्रेसप्रणित युपीए सरकारनेही अशा कृषीसुधारणांबाबत आग्रह धरला होता. नवीन कायद्यांमुळे शेती क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढून शेतकर्‍यांना अधिकचे चार पैसे मिळण्यात मदतच होणार आहे.

मध्यंतरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहुचर्चित भेटीचा उल्लेख न करता जानकर म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर किंवा व्यापक हितासाठी गरजेनुसार इतर पक्षाच्या प्रमुखांना, मंत्र्यांना भेटणे गैर नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा चर्चांऐवजी पक्षसंघटन मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. पक्षाचे वतीने मार्च 2021 अखेर 50लाख सक्रीय सभासद नोंदणी केली जाईल. त्यासाठी अँपची निर्मिती केल्याचे जानकर म्हणाले. 

यावेळी राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले, प्रभारी माणिकराव दांगडे पाटील, ज्ञानेश्वर सलगर, आण्णासाहेब पाटील, नितीन धायगुडे, अजित पाटील, वैशाली वीरकर, सुवर्णा जर्‍हाड पाटील, कविता माने, पोपट क्षीरसागर, उमाजी चव्हाण, शरद बाचकर, संदीप चोपडे, अँड.अमोल सातकर यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com