esakal | आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर

बोलून बातमी शोधा

RTE

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत सोडत (लॉटरी) बुधवारी (ता.७) दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे.

आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत सोडत (लॉटरी) बुधवारी (ता.७) दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

हेही वाचा - लस घ्यायला जाणंही होतं आर्थिक अडचणीचं; वेल्ह्यात स्वखर्चातून उपलब्ध केली बस

आतापर्यंत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत असून त्यासाठी सुमारे दोन लाख २२ हजार ६२० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. याअंतर्गत ही सोडत जाहीर होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नेहमीप्रमाणे ही सोडत जाहीरपणे आयोजित न करता सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात येणार आहे. तसेच सोडत जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.