'जम्बो'च्या सर्जरीवरून रुबल अग्रवालांसह राजेंद्र मुठेंचीही परीक्षा 

rubal agarwal.jpg
rubal agarwal.jpg

पुणे : पुण्यातील "जम्बो' अगदीच "क्रिटिकल' झाल्यानंतर त्याचा ताबा घेऊन व्यवस्थेचीच नेमकी "सर्जरी' करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सोपविली गेली आहे. तिसरी महत्त्वाची जबाबदारी घेताना अग्रवाल यांनी रुग्णांसाठी "जम्बो सुविधा' उभारल्या आहेत. नव्या डॉक्‍टर, नर्सची नेमणूक, औषधांचा साठा, अॅम्ब्युलन्स, डॉक्‍टरांकरिता आवश्‍यक तेवढ्या सुविधा पुरवून "जम्बो'ला नवे रुप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. या मोहिमेत अग्रवाल यांच्या दिमतीला महापालिकेतील उपायुक्त राजेंद्र मुठे यांचीही नेमणूक केली आहे. मात्र, अत्यंत कठीण काळात या दोघांची जबाबदारी वाढवून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे त्यांची "परीक्षा' घेणार असल्याचे स्पष्ट आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जम्बोच्या नव्या नेमणुकीने अग्रवाल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त, "स्मार्टसिटी'च्या "सीईओ'पदासह तीन ठिकाणचा कार्यभार राहणार आहे. गरीब आणि गरजू रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या "जम्बो'तील बेजबाबदारपणाने अनेक रुग्णांचा जीव घेतला; तर अत्यवस्थ रुग्ण उपचारविना पडून राहिले. त्यावर जम्बोच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या "लाइफलाइन'वर कारवाईचा बडगा उगारूनही सेवा-सुविधांत बदल न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी "जम्बो' ताब्यात घेतले आणि पायाभूत सुविधा उभारल्या. त्याचवेळी मनुष्यबळ आणि अत्यावश्‍यक बाबी पुरवून "जम्बो'तील व्यवस्था बदलली. त्यापलीकडे जाऊन शनिवारी रुग्णांना दाखल करून घेणे, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना बरे करणे आणि अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचविण्याचे उपाय केले. अर्थात, औषधांचा पुरवठा, रुग्णांना गरजेनुसार इतरत्र हलविणे किंवा त्यांना घरातून आणण्यासाठी "कार्डियाक अॅम्ब्युलन्स'ही आणल्या. नियोजनाअभावी गोंधळलेल्या डॉक्‍टर, नर्ससाठी नवनव्या सुविधा पुरविल्या. 


जम्बोत आजघडीला जवळपास तीनशे रुग्ण आहेत. त्यातील बहुतेकांना अन्य आजार आहेत. उपचारदरम्यान रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्या रुग्णांची "मेडिकल हिस्ट्री' जाणून घेत त्यांच्यावरील नेमक्‍या उपचारांसाठीही जम्बोत यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णांनी तपासण्या करून त्यांना तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचार पुरविले जाणार आहेत, असे "जम्बो'चे नवे समन्वयक राजेंद्र मुठे यांनी सांगितले. 

जम्बोतील सगळी व्यवस्था बदलण्यात आली असून, ज्यामुळे प्रत्येकाला सहज उपचार मिळतील. त्यातून त्यांना बरे करणे आणि मृत्यूदर पूर्णपणे रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर उपाय करण्यात आले आहेत. मात्र, आता रुग्णांच्या नातेवाइकांनी यंत्रणेला सहकार्य करावे. 
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com