esakal | पुणे : सत्तारूढ आणि विरोधी पक्षात जाणवते संवादाची अनुपस्थिती : विजय नाईक
sakal

बोलून बातमी शोधा

विजय नाईक

सत्तारूढ आणि विरोधी पक्षात जाणवते संवादाची अनुपस्थिती : विजय नाईक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘देशाच्या भल्यासाठी सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात संवाद गरजेचा आहे. देशातील प्रश्नांवर चर्चा, सामंजस्य व्हायला हवे. परंतु दिल्लीत सध्या अशा संवादाची उणीव भासते. त्यामुळे शेतकरी, समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था, विद्यार्थी, पत्रकारिता यांच्यात विसंवादाचा सूर जाणवत आहे.’’, असे मत ‘सकाळ’चे सल्लागार संपादक पत्रकार विजय नाईक यांनी व्यक्त केले.

लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क यांच्या वतीने पत्रकारितेतील योगदानाबद्दल विजय नाईक आणि साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, नाईक यांच्या पत्नी दीपा आणि लिंबाळे यांच्या पत्नी कुसुम, ‘लोकशाही समंजस संवाद’चे संपादक अरुण खोरे उपस्थित होते.

नाईक म्हणाले,‘‘दिल्लीतील पत्रकारितेच्या निमित्ताने राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर लिहायची संधी मिळाली. राजकारणात बातम्यांची पेरणी करणारे नेते खूप असतात. परंतु प्रमोद महाजन, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्यांकडून राजकीय विश्लेषण जाणून घेता आले. दक्षिण आफ्रिकेत वंशभेद संपला त्यावेळी ‘सकाळ’ने तेथे जाऊन वार्तांकनाची संधी दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवाद, मंत्रिमंडळ स्थापना याचे वार्तांकन करायला मिळाले. नेल्सन मंडेला यांना तीनदा भेटता आले.’’

हेही वाचा: ZEE5 Global वर रंजक मराठी मालिका, चित्रपट आणि ओरिजनल्सची मेजवानी

सत्काराला उत्तर देताना डॉ. लिंबाळे म्हणाले,‘‘दलित साहित्यातील लेखक म्हणून प्रत्येक वेळी निंदा केली जायची. लेखक म्हणून मान्यता मिळावी, अशी आमची मागणी होती. परंतु दिल्लीतून ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ मिळाल्याचा फोन आला आणि आजवर केलेल्या कामाला मान्यता मिळाल्याचे समाधान लाभले.’’ यावेळी कुवळेकर यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन जीवराज चोले यांनी केले.

‘‘गेल्या पाच-सहा वर्षात देशातील नागरिक अनामिक भयाच्या वातावरणात वावरत आहेत. अशा काळात देशात लोकशाहीसाठी संवादाची गरज आहे. लोकशाही टिकविणे अवघड असताना भारतीय राज्य घटना टिकवून ठेवणे गरजेचे झाले आहे.’’

- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ समीक्षक

‘‘दलित साहित्यातील सौंदर्य, सामर्थ्य डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या लिखाणात दिसते. त्यांच्या लिखाणाची नोंद मराठी साहित्याला घ्यावी लागेल. दिल्लीत ३० वर्षांच्या काळात विजय नाईक यांचा सहवास लाभला. नाईक हा माणूस वेडा माणूस आहे. सतत चर्चा करण्याची आणि सातत्याने व्यवस्थेत सुधारणा करण्याची तळमळ नाईक यांच्यात आहे.’’

- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री

loading image
go to top