आंबेगावकरांनो, अफवांवर विश्‍वास ठेवू नका...ही आहे वस्तुस्थिती... 

fake news
fake news

मंचर (पुणे) : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांसह प्रशासनातील अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. पण, आंबेगाव तालुक्‍यात गेली दोन दिवस पसरलेल्या वेगवेगळ्या अफवांचे खंडन करताना प्रशासनातील अधिकारी वर्गाची व पत्रकारांची डोकेदुखी वाढली असून, अक्षरशः दमछाक झाली आहे. 

लॉकडाउन सुरू झाल्यापासून आंबेगाव तालुक्‍यातील गावात प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जनजागृती करून नागरिकांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, पतसंस्था व बॅंकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे तालुक्‍यात अजून करोना विषाणूचा शिरकाव टाळण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पण, गेल्या दोन दिवसांपासून, "पेठ येथील तीन जणांचा करोना विषाणू वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मंचरला मिलिटरी आली व प्रशासनातील एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाली.' या अफवांनी तालुक्‍यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पोलिस, महसूल, मंचर उपजिल्हा रुग्णालय व पत्रकारांना फोन करून, "हे खरे आहे का?' अशी विचारणा केली जात आहे. संबंधितांना उत्तरे देताना प्रशासनातील अधिकारी व पत्रकारदेखील त्रस्त झाले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी व आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले, ""मुंबईवरून आलेल्या पाच जणांना पेठ येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात होम क्वारंटाइन करून ठेवले होते. त्यापैकी तीन जणांना वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्या तिघांचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाली नाही.'' 

"अफवा पसरविणाऱ्यांना शोधणार' 
""मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस अधिकारी व पोलिस व्यवस्थित व काळजीपूर्वक काम करत आहेत. मिलिटरी आल्याची माहिती चुकीची व दिशाभूल करणारी आहे. अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. अफवा पसरविणाऱ्याचा शोध घेण्याचे काम मंचर पोलिसांनी सुरू केले आहे,'' असे मंचरचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले. 

"नागरिकांनी माहिती द्यावी' 
आंबेगाव तालुक्‍याच्या शेजारी असलेल्या खेड तालुक्‍यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्‍यातील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. दुकानांमध्ये साहित्य खरेदी करताना सोशल डिस्टन्सचा वापर करावा. पुणे- मुंबईवरून विनापरवाना आलेल्यांची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी, असे आव्हान प्रशासनाने केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com