
रूपाली पाटील यांची पुणे उपाध्यक्षपदी निवड; राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांची पुणे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. तेव्हाही त्यांचे नाव चर्चेत होते. (Rupali Patil elected as Pune City President)
मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रूपाली पाटील (Rupali Patil) नेहमीच चर्चेत होत्या. राष्ट्रवादीच्या आंदोलनात आक्रमक चेहरा म्हणून रूपाली पाटील यांच्याकडे बघितले जाते. मंगळवारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यानंतर रूपाली पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने रूपाली पाटील यांना मोठी जबाबदारी देऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. रूपाली पाटील (Rupali Patil) यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात आक्रमक चेहरा मिळाला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या स्वाक्षरीने निवड पत्र रूपाली पाटील यांना देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार रूपाली पाटील यांना अभिनंदनाचे पत्र देण्यात आले आहे.