रुपी बॅंक विलीनीकरणक्षम - सुधीर पंडित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

‘रुपी’ची देणी १४५० कोटी रुपये असून, त्यांची एकूण रक्कम व मालमत्ता ९६१ कोटी रुपये आहे. विमा महामंडळाकडून ३०० कोटी रुपये मिळतील. १९० कोटी रुपयांचा फरक राहील. त्यासाठी ठेवीदारांच्या सहकार्याची गरज आहे. ठेवीदारांचे वेगवेगळ्या शहरांत मेळावे घेत आहोत. 
-सुधीर पंडित, अध्यक्ष , बॅंक प्रशासकीय मंडळ

पुणे - ‘रुपी सहकारी बॅंकेची वसुली वाढली असून, समाधानकारक प्रगतीमुळे बॅंक आता विलीनीकरणक्षम झाली आहे. त्याबाबतचे प्रस्ताव राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांना पाठविले आहेत,’’ अशी माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. बॅंकेने थकबाकीदारांविरुद्ध फौजदारी कारवाईला सुरवात केली आहे.

विलीनीकरणासाठी प्रस्ताव दिलेल्या बॅंकांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. पूर्वीपेक्षा ‘रुपी’ची स्थिती थोडी बरी झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘रुपी’ला ५५ लाख रुपये नफा झाला. या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपये नफा होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. थकीत कर्ज वसूल होणार नाही, असे गृहीत धरून त्याची पूर्ण तरतूद केली जाते. ते कर्ज वसूल केल्यावर, आधी तरतूद केलेली रक्कम बॅंकेला मिळते. त्यामुळे नफा झाला, अशी माहिती त्यांनी दिली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ. अच्युत हिरवे, विजय भावे, सदानंद जोशी या वेळी उपस्थित होते. 

थकीत कर्जाच्या वसुलीबाबत पंडित म्हणाले, ‘‘मार्च २०१६ पर्यंत ७१ कोटी रुपये वसूल झाले होते. रिझर्व्ह बॅंकेने वसुलीसाठी ३३ कोटी रुपये उद्दिष्ट ठेवले होते. गेल्या आठ महिन्यांत प्रत्यक्षात ९१ कोटी रुपये वसूल झाले. एकरकमी कर्ज परतफेड योजनेंतर्गत (ओटीएस) आजपर्यंत ६२ कोटी वसूल झाले. या आर्थिक वर्षात १२५ कोटी रुपये वसूल होण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून आम्ही नुकतीच तपासणी करून घेतली. तेथील अधिकाऱ्यांसोबत दरमहा बैठका होत आहे.’’

विलीनीकरणासाठी ‘रुपी’ची बलस्थाने सांगताना ते म्हणाले, ‘‘१०४ वर्षे जुन्या असलेल्या या बॅंकेचे सहा लाख दहा हजार खातेदार आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरात ३५ शाखा असून, ठेवीमध्ये कमी व्याजदराच्या रकमेचा वाटा ४५ टक्के आहे. बॅंकेच्या खात्याची माहिती सीबीएस प्रणालीद्वारे एकत्रित करीत आहोत. खातेदारांचे केवायसी पूर्ण करीत आहोत. या खात्यांचा १५ वर्षांचा डाटा एकत्रित मिळणे ही कोणत्याही मोठ्या बॅंकेच्या दृष्टीने अत्यंत मोठी बाब आहे. ‘रुपी’च्या सध्याच्या समस्येचा अभ्यास व निराकरण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बॅंकिंग व आर्थिक क्षेत्रांतील तज्ज्ञांची कार्यशाळा लवकरच घेणार आहोत.’’

 एक लाख रुपयांपर्यंतचे ठेवीदार - ५,७४,३२९
 एकूण रक्कम - ५९६ कोटी रुपये
 एक लाखापेक्षा जास्त रकमेचे ठेवीदार - ३०,०००
 एकूण रक्कम - ८१५ कोटी रुपये
 हार्डशिपचे खातेदार - ५५५३३
 दिलेली रक्कम - २२५ कोटी रुपये

आर्थिक स्थिती कोटी रुपयांत

ठेवी    १४०३
कर्जे    ४३४ 
गुंतवणूक    ६२८
संचित तोटा    ६९८
वसुली    १६२

तिघांवर कारवाई
जाणूनबुजून थकबाकीदार (विलफूल डिफॉल्टर) घोषित करण्यासाठी वीस थकबाकीदारांवर ‘रुपी’च्या प्रशासकीय मंडळाने कारवाई सुरू केली आहे. १८ थकबाकीदारांवर फौजदारी कारवाई करण्याचे ठरले असून, त्यापैकी तिघांवर कारवाई सुरू झाली. 

Web Title: Rupee Bank merger forgive