ग्रामीण भागातच पेट्रोल पंपांवर पैसे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

दिवसाला दोन हजार मिळणार; शहरात योजना नाही 

पुणे - एटीएमची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागांतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैशांची सोय व्हावी, यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे स्वाइप मशिन असलेल्या पेट्रोल पंपांवर दिवसाला दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. मात्र, बहुतांश शहरात एटीएम आणि बॅंकांची सुविधा उपलब्ध असल्याने येथे मात्र ही सुविधा देण्यात आलेली नाही. 

दिवसाला दोन हजार मिळणार; शहरात योजना नाही 

पुणे - एटीएमची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागांतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैशांची सोय व्हावी, यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे स्वाइप मशिन असलेल्या पेट्रोल पंपांवर दिवसाला दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. मात्र, बहुतांश शहरात एटीएम आणि बॅंकांची सुविधा उपलब्ध असल्याने येथे मात्र ही सुविधा देण्यात आलेली नाही. 

देशभरातील सरकारी कंपन्यांच्या सातशे पेट्रोल पंपांवर डेबिट कार्डद्वारे शुक्रवारी पैसे देण्यास सुरवात झाली. या आठवडाअखेरीस ही सुविधा अडीच हजार पंपांवर आणि लवकरच वीस हजार पंपांवर सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

देशभरात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्यांचे मिळून सुमारे बावन्न हजार पेट्रोल पंप असून, त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे साडेचार हजार आहेत. इंडियन ऑईल कंपनीचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय), तर इंडियन ऑईल कंपनीचे आयसीआयसीआय बॅंक आणि भारत पेट्रोलियम कंपनीचे दैनंदिन व्यवहार एचडीएफसी बॅंकांबरोबर होतात. 

एसबीआयतर्फे इंडियन ऑईल कंपनीच्या ग्रामीण भागातील पंपांवर वरील सुविधा देण्यात येणार आहे. त्यानुसार अकरा पंपांवर ही सुविधा सोमवार-मंगळवारदरम्यान सुरू होईल. मात्र, त्यासाठी संबंधित कंपनी बॅंकेच्या शाखांसोबत करार करेल.

पहिल्या टप्प्यात ग्रामीण भाग, दुसऱ्या टप्प्यात तालुका आणि तिसऱ्या टप्प्यात शहरस्तरावर ही योजना लागू होईल, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. शहरातील बॅंकांच्या शाखा, एटीएमची उपलब्धता लक्षात घेता, येथील पंपांवर पैसे उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता नाही, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

डेबिट कार्डद्वारे मिळणार पैसे 
नागरिकांना Cash@Pos activity या योजनेअंतर्गत स्वाइप मशिनवर डेबिट कार्ड स्वाइप केल्यावर दोन हजार रुपये मिळणार आहेत. बॅंक आणि पेट्रोलियम कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार पंपांवर सुरवातीला एक लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर आवश्‍यकतेनुसारही बॅंक रक्कम पुरविणार आहे. 

येथे मिळणार पैसे

 • गणेश सेवा केंद्र, मोरगाव 
 • सद्‌गुरू सेवा केंद्र, सोलापूर रस्ता  
 • व्यवहारे सेवा केंद्र, इंदापूर
 • फडतरे सेवा केंद्र, वालचंदनगर 
 • संत मुक्ताई सेवा केंद्र, बारामती 
 • कदम पाटील केंद्र, राहू, दौंड 
 • साई पेट्रोलियम कृषी सेवा केंद्र, पारगाव, दौंड  
 • जयहिंद सेवा केंद्र, आंबेगाव 
 • मंजूळाई पेट्रोलियम कृषी सेवा केंद्र, मोई. ता. खेड 
 • राम लक्ष्मण पेट्रोलियम कृषी सेवा केंद्र, आंबेठाण, ता. खेड  
 • भीमाशंकर सेवा केंद्र, भीमाशंकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural inside the petrol pumps money