esakal | #SaathChal बेलवाडीत रंगले गोल रिंगण
sakal

बोलून बातमी शोधा

रिंगण सोहळ्यात धावणारे मानाचे अश्‍व.

#SaathChal बेलवाडीत रंगले गोल रिंगण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे रविवारी सकाळी उत्साही वातावरणात पार पडले. आकाशात नभांनी केलेली गर्दी ही रिंगण सोहळा पाहण्यासाठी झाल्याचेच भासत होते.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटोपून आज सकाळी साडेसातच्या सुमारास बेलवाडीत रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. तोफांची सलामी देत पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीतळावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरवात झाली.

पताकावाल्यांनी देहभान विसरून पहिली फेरी मारली. त्यानंतर डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांनी फेरी मारून देहूपासून आलेले शीण घालविला. विणेकरी, टाळ-मृंदगवालेही देहभान हरपून रिंगण सोहळ्यात धावत होते. 

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोहळ्यातील अश्‍वाचे पूजन करून अश्‍वाच्या रिंगणला सुरवात झाली. वायुवेगाने अश्‍व धावू लागताच ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. अश्‍वाने तीन फेऱ्या मारून रिंगण सोहळा पूर्ण केला. रिंगण पूर्ण होताच वैष्णवांनी विविध खेळ खेळण्यास सुरवात केली. फुगडी खेळण्यात पोलिस, वैष्णव, वारकरी दंग होते. अनेक तरुण वारकऱ्यांनी उंच उंच मनोरे रचले. 

पालखी सोहळा प्रमुख सुनील महाराज मोरे, आमदार भरणे, वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई, इंदापूरचे सभापती करणसिंह घोलप रिंगण सोहळ्यात फुगडी खेळण्यात दंग झाले होते. 

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयातील विद्यार्थी विठ्ठल-रुक्‍मिणी, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा करून आले होते. त्यांनी लेझीमच्या तालावर पालखीचे स्वागत केले. या वेळी नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतिलाल जामदार, संचालक सर्जेराव जामदार, सरपंच माणिक जामदार, उपसरपंच स्वाती पवार, शहाजी शिंदे, अनिल खैरे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकासाधिकारी माणिकराव बिचकुले उपस्थित होते.

loading image