#SaathChal पाचशे फिरती स्वच्छतागृहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

#SaathChal  पाचशे फिरती स्वच्छतागृहे

#SaathChal पाचशे फिरती स्वच्छतागृहे

देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी देहू ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. पालखी प्रस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरातील १५० अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे पालखीमार्ग रुंद झाले आहेत, तर इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. देहूतील विविध ठिकाणी ५०० फिरती स्वच्छतागृह सोमवारी ठेवण्यात आली.

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता. ५) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारकऱ्यांना सोयी मिळाव्यात यासाठी, ग्रामपंचायत प्रशासनाची लगबग सुरू आहे. वारीसाठी आलेल्या भाविकांना यंदा ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर आणि सरपंच उषा चव्हाण म्हणाल्या, ‘‘देहू विकास आराखड्यांतर्गत विविध कामे झालेली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. पालखी सोहळ्यापूर्वी गावातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी २५ कर्मचारी तैनात केले आहेत. इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. भाविकांच्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गावातील विहीर, हातपंपाची दुरुस्ती सुरू आहे. तसेच पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली आहे. गावात विकास आराखड्यांतर्गत २६० स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. विनामोबदला भाविकांना स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. तसेच निर्मलवारीसाठी ५०० फिरती स्वच्छतागृहे विविध नऊ ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत. जिल्हा हिवताप केंद्राकडून दोन दिवसांत गावात औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएल पावडरचा साठा उपलब्ध केला आहे. धूर फवारणीसाठी चार मशिन उपलब्ध आहेत. माळवाडी, विठ्ठलवाडी या गावातही स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. पालखीमार्गावर खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच साइडपट्टे भरण्यासाठी मुरूम टाकण्यात आला आहे.’’