esakal | #SaathChal वाघळवाडीत वारकऱ्यांना झुणका-भाकर
sakal

बोलून बातमी शोधा

वाघळवाडी (ता. बारामती) - संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होताना.

#SaathChal वाघळवाडीत वारकऱ्यांना झुणका-भाकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमेश्वरनगर - संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याला शुक्रवारी निंबूत छप्री ग्रामस्थांनी चहा-पोहे देऊन स्वागत केले, तर वाघळवाडी ग्रामस्थांनी झुणका- भाकर व मिरचीचा ठेचा, असा बेत केला होता. वारकऱ्यांसह भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला.

सकाळी सहा वाजता निंबूत (ता. बारामती) येथे उत्तरपूजा पार पडल्यानंतर पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. साडेसहा वाजता पालखीने प्रस्थान केले. नीरा- बारामती रस्त्याकडेला गडदरवाडी- खंडोबाचीवाडी व फरांदेनगर येथे जमलेल्या ग्रामस्थांनी चालत्या पालखीचे दर्शन घेतले. आठ वाजता पालखी निंबूत छप्री येथे न्याहारीसाठी विसावली. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, युवा नेते गौतम काकडे, शिवाजी लकडे, शिवाजी दगडे, सतीश दगडे आदींनी पालखीचे स्वागत केले.

ग्रामस्थांनी पालखीप्रमुख व दिंडीप्रमुखांचा सत्कार केला. असंख्य ग्रामस्थांनी घरून चहा-नाश्‍ता आणून वाटपासाठी टेबल लावले होते. गौतमभय्या युवा मंचच्या वतीने पोहेवाटप करण्यात आले, तर ग्रामस्थांनी चहाची सोय केली होती. 

वाघळवाडी येथील पालखी ओट्यावर अकरा वाजता भोजनासाठी पालखी सोहळा विसावला. या ठिकाणी सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्‍य सावंत यांच्या हस्ते पालखीचे व पालखीप्रमुखांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सदस्य हेमंत गायकवाड, महादेव सावंत, गणेश जाधव, ग्रामसेवक सुभाष चौधर, डी. टी. लोणकर, तलाठी अरुण होळकर उपस्थित होते. पालखीप्रमुख ॲड. गोपाळ गोसावी, श्रीकांत गोसावी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. 

दरम्यान, रेणुकानगर येथील हरणाईमाता मंडळाच्या वतीने पिठलं- भाकरी व मिरचीचा ठेचा असे भोजन देण्यात आले. ग्रामस्थ मंडळाने सांबर-भात व शिरा असे भोजन दिले. अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे तुळसे कुटुंबीयांच्या वाड्यात कल्याण तुळसे व मनीषा तुळसे यांच्या हस्ते सोपानदेवांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. संजय तुळसे, सुनील तुळसे, गोपी तुळसे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

loading image