esakal | #SaathChal चौफुला येथे ढोल ताशांचा गजर
sakal

बोलून बातमी शोधा

चौफुला (ता. दौंड) - संत तुकाराम महाराज पालखीच्या दर्शनासाठी बुधवारी भाविकांनी केलेली गर्दी.

#SaathChal चौफुला येथे ढोल ताशांचा गजर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केडगाव - चौफुला (ता. दौंड) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील १० गावांतील भाविकांनी गर्दी केली. गर्दी जास्त असल्याने पालखी सोहळा येथे तासभर विसावला होता. केडगाव येथील नितीन जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील मोरया ढोल ताशा पथकाने ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जंगी स्वागत केले.

भांडगाव येथील पाहुणचार आटोपून पालखी सोहळा साडेतीन वाजता चौफुला येथे आला. येथे सरपंच प्रणिता सोडनवर, उपसरपंच सोमनाथ गडधे यांनी स्वागत केले. चौफुला येथे बोरीपार्धी, दापोडी, खोपोडी, केडगाव, नानगाव, पारगाव, वाखारी, देऊळगावगाडा, पडवी येथील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी महाविद्यालयीन युवकांनी पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत केली. भांडगाव येथे पालखी सोहळ्यावर पावसाचा शिडकावा झाला. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली.

चौफुला परिसरात सह्याद्री कंपनी, मोरया ग्रुप, बोरमलनाथ मंडळ, ग्रामपंचायत बोरीपार्धी, वर्षा उद्योग समूह, महालक्ष्मी टायर्स, अंबिका कला केंद्र यांच्यासह विविध संस्था, हॉटेल्स, कंपन्या, ग्रामस्थ, गणेश मंडळांनी वारकऱ्यांना अन्नदान केले. परिसरातील ग्रामस्थांनी चौफुला येथे येऊन अन्नदान केले. माउली ताकवणे यांनी पालखी रथाच्या बैलासाठी चारा आणला होता. चौफुला येथे धायगुडेवाडी प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोनमधील विद्यार्थ्यांची बाल दिंडी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड बॉल वारकऱ्यांना देण्यात आले. एक मित्र एक वृक्ष व दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने नेत्र जनजागृती अभियानाची सहा हजार पत्रके वाटण्यात आली. वाखारी येथे अविनाश राऊत यांनी वारकऱ्यांचे मोफत दाढी आणि केस मोफत कापले. त्यांचे सेवेचे यंदा पंधरावे वर्ष आहे.

पालख्यांचा संगम 
संत तुकाराम महाराज व श्री संतराज महाराज पालखी सोहळा यांचा चौफुला चौकात संगम झाला. या वेळी भाविकांनी दोन्ही सोहळ्यांचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले. भाविकांनी दोन्ही संतांच्या पालख्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. दोन्ही पालखी सोहळ्यांमुळे चौफुला चौकाला जत्रेचे स्वरूप आले होते.

loading image