वाढदिवस साजरा करणार नाही; वाचा सचिनची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Sachin-Tendulkar
Sachin-Tendulkar

पुणे - देशात २४ एप्रिलचा दिवस क्रिकेटप्रेमी एक सण म्हणून साजरा करतात. कारण साधे आहे. २४ एप्रिलला सचिन तेंडुलकरचा वाढदिवस ! ‘कोविड १९’ अर्थात कोरोनाच्या जागतिक साथीमुळे सचिनने जाहीर केले आहे की, तो यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही. प्रत्यक्ष भेट होणार नसली, तरी सचिनने फोनवरून ‘सकाळ’ला खास मुलाखत दिली. ज्यात सचिनने क्रिकेटपासून सध्याच्या परिस्थितीत काय करणे आपले कर्तव्य आहे, हे मनापासून सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
प्रश्‍न - सध्याच्या परिस्थितीत आपल्याला जग डोळ्यासमोर बदललेले बघायला मिळते आहे?
सचिन -
 हो ना.. कोरोनाच्या साथीमुळे जग बदलते आहे. घराचे मोल सगळ्यांना समजते आहे. तसेच मला वाटते छोट्या आनंदाचे मोल आता नव्याने समजणार आहे. कोरोनाची साथ येण्याआधी आपल्या आशा-आकांक्षा किती मोठमोठ्या होत्या. सर्व बदलणार आहे आता. साधी गोष्ट बघा की मित्राच्या घरी चहा प्यायला जाणे, हा किती सुंदर, आनंद देणारा प्रसंग असतो. आपण तो गृहीत धरत होतो. त्यात काय विशेष, असे वाटत होते. आणि आता घराबाहेर पडून मित्राकडे चहा प्यायला जाण्याचे मोल लॉकडाउन संपल्यावर आपल्याला नव्याने समजणार आहे.

आपली १३० कोटींची टीम
मी १५ मार्चपासून कुठेही बाहेर गेलो नाही, कोणालाही भेटलेलो नाही. विशेष काहीच नाही याचे, कारण कोरोनाच्या संकटांवर मात करायला आपण सगळे कटिबद्ध आहोत. मला वाटते आपली १३० कोटींची एक टीम आहे. आपला संघ संकटाच्या, आव्हानाच्या काळात एकत्र असेल आणि सगळ्यांचे ध्येय एक असेल, तर आपण कोणत्याही आव्हानाला परतवू शकतो. पण, जर एक जरी आपल्या संघातील खेळाडू चुकत असला, तर त्याचा परिणाम संपूर्ण संघावर म्हणजे देशाच्या प्रगतीवर होणार आहे.

गेल्या ५ वर्षांत तू बरेच समाजकार्य केलेस. दोन गावांचा कायापालट करायचा प्रयत्न केलास; तसेच बीड जिल्ह्यातील एका शांतीवन संस्थेसोबत ऊसतोडणी कामगार आणि तमाशा  कलावंतांच्या मुलांकरिता शाळेची इमारत बांधलीस; पण कुठे जास्त वाच्यता केली नाहीस, असे का?
सचिन -
 कारण सरळ आहे. माझ्या जीवनाची पहिली इनिंग समोरच्या संघाने उभारलेल्या आव्हानांचा पाठलाग करणे ही होती. खेळातून निवृत्ती घेतल्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये माझे ध्येय समाधान  मिळवणे हे आहे. सर्व समाजकार्य मी केवळ समाधानाकरिता करतो. समाजकार्य हे दुसऱ्याला सांगण्याकरिता किंवा दाखवण्याकरिता नसते, असे माझे मत आहे.

एकीकडे तू चक्कं १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याचा अचाट पराक्रम करून दाखवला आहेस आणि तसेच तुला भारतरत्नचा सर्वोच्च नागरी मान देण्यात आला आहे. दुसरीकडे १४० कोटी भारतीय तुला अहो न म्हणता एकेरीत ‘सचिन’ म्हणतात. काय म्हणशील या प्रेमाला.
सचिन -
 तू हे आठवण करून दिल्यावर मला माझ्या बाबांनी दिलेल्या मुलाखतीची आठवण झाली. ते म्हणाले होते की सचिनवर सगळे भारतीय किती प्रेम करतात. त्याला सचिन असे  प्रेमाने बोलून आपल्या कुटंबाचा एक घटक मानतात. मला खरंच वाटते की ही देवाची कृपा आणि भारतवासीयांचा आशीर्वाद आहे. मला कल्पना आहे की या गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकत नाहीत. मला हे प्रेम मिळाले म्हणून मी देवाचे आभार मानतो आणि स्वत:ला भाग्यवान समजतो.

कसोटी क्रिकेटची लज्जत कायम ठेवायला काय करायला पाहिजे?
सचिन -
 माझ्याकरिता सर्वात आव्हानात्मक प्रकार कुठला असेल क्रिकेटमध्ये, तर ते आहे कसोटी खेळणे. मी पहिल्यांदा इतकेच सांगेन, की कसोटी क्रिकेटचा दर्जा उंचावायला उत्तम खेळपट्ट्या बनवणे खूप महत्त्वाचे आहे. बघा की टी२० सामन्यात फलंदाज प्रत्येक चेंडू तडकवायला बघत असतो. एकदिवसीय सामन्यातही बरेच नियम बदलले गेल्याने आपल्याला जास्त धावांची बरसात करणारे सामने बघायची सवय झाली आहे. आतल्या वर्तुळात एक जास्त खेळाडू उभा करणे भाग आहे;

तसेच दोन बाजूंनी दोन नवे चेंडू वापरले जायला लागल्याचे आपण एकदिवसीय सामन्यात बघत आहोत. पाटा खेळपट्टी, दोन नव्या चेंडूने सामने खेळले जात असल्याने चेंडू जुना होत नाही. या नियमांमुळे फलंदाजांची दादागिरी बघायला मिळते. त्यामुळे कसोटी सामन्यात तोच काहीसा फायदा गोलंदाजांना देणे मला गरजेचे वाटते.

खेळपट्ट्या नुसत्याच वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या नसाव्यात, तर कधी तरी फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्याही असाव्यात. टी२० सामन्यातील प्रत्येक चेंडूवर काही ना काही होणार, असे प्रेक्षकांना वाटत राहते. एकदिवसीय सामन्यातही जवळपास तसेच दृश्‍य बघायला मिळते. मग कसोटी सामन्यात तरी गोलंदाजांना थोडे झुकते माप देणे गरजेचे नाही का? मी आयसीसीला इतकीच विनंती करेन, की कसोटी सामन्याचा कालावधी कमी करण्याचा विचार करण्यापेक्षा त्याचा दर्जा उंचावला तर प्रेक्षक कसोटी क्रिकेटचा आनंद घेऊ शकतील. पाचऐवजी चार दिवसांचा कसोटी सामना करायचा विचार मला अजिबात पटत नाही. एकदम फलंदाजीला पोषक खेळपट्टी असेल आणि सामन्यात काही स्पर्धात्मक होत नसेल, तर खेळात लज्जत येणार कशी? गोलंदाजांना थोडी मदत करणाऱ्या खेळपट्टया बनवल्या गेल्या, तर कसोटी क्रिकेट रंजक होऊ शकते.  कसोटी क्रिकेटचा आत्मा खेळपट्टीत आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.

एक दिवसीय सामन्यातही काही बदल करावेत, अशी क्रांतिकारी योजना तू सुचवली होतीस...
सचिन -
 एकदिवसीय क्रिकेट अजून मजेदार आणि काळाला धरून होण्याकरिता मी एक उपाययोजना सुचवली होती. विचार करून मला असे वाटले, की एकदिवसीय सामन्यात सलग ५०  षटकं एका संघाने खेळण्यापेक्षा २५-२५ षटकांच्या दोन इनिंग का खेळू नयेत. कारण देतो तुला उदाहरणासह. २००२ साली आम्ही श्रीलंकेत चॅंम्पियन्स ट्रॉफी खेळत होतो. तेव्हा अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली आणि मग आम्ही धावांचा पाठलाग चालू केला असताना १० षटकांनंतर पाऊस आला.

दुसऱ्या दिवशी सामना नव्याने चालू केला गेला असताना परत श्रीलंकेने पहिली फलंदाजी केली आणि आमच्या फलंदाजीच्या ८ षटकांनंतर परत पाऊस आला. म्हणजेच एकूण ११८  षटकांचा खेळ होऊनही सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला नाही. मला हे पटत नाही. जर २५-२५ षटकांचे दोन डाव झाले, तर बऱ्याच समस्या सुटतील.  नाणेफेकीचे अनावश्‍यक महत्त्व संपेल. कारण मी रात्री खूप दव पडणाऱ्या काही मैदानांवर दुसरी फलंदाजी करणारा संघच जिंकताना बघितला आहे.

२५-२५ षटकांचे दोन डाव केले, तर दोनही संघांना समान संधी असेल आणि डावपेचांना नवीन धार येईल. दोनही बाजूचे फलंदाज एकदाच फलंदाजी करतील फक्त २५-२५ षटकांच्या दोन टप्प्यात. कल्पना जरा वेगळी आहे पण विचार करून बघण्यासारखी आहे.

नियम, कर्तव्याचे पालन गरजेचे
माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, की ही लढाई जिंकण्याकरिता सगळ्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. कोणाला काहीही हाल सहन करावे लागले किंवा काहीही त्याग करावा लागला तरी बेहत्तर; पण आपण सगळ्यांनी एक राहणे आणि नियम, कर्तव्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com