
संकेश्वर पीठाचे शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांच्यातर्फे श्री सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर’ हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
Sadgurudas Maharaj : सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर सन्मान’ जाहीर
पुणे - संकेश्वर पीठाचे शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांच्यातर्फे श्री सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर’ हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य विद्यानरसिंह भारती, कंपाली पीठाचे आचार्य नारायण विद्याभारती आदींच्या उपस्थितीत नागपूरच्या रेशीमबागमधील सुरेश भट सभागृहात बुधवारी (ता. ११) होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय श्री गुरूमंदिर परिवार संयोजन समितीचे सदस्य निखिल सुरंगळीकर व मंगेश बरबडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘संकेश्र्वर पीठातर्फे गेल्या शतकात अनेक मान्यवरांना विविध पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. याच परंपरेत आता श्री सद्गुरुदास महाराज यांना धर्मभास्कर सन्मानाने गौरविले जात आहे.
सन्मान प्रदान सोहळ्याला बीडचे ह. भ. प. अमृताश्रमस्वामी, मुकुंद जाटदेवळेकर, काशीचे गणेश्वर शास्त्री द्राविड, डॉ. म. रा. जोशी, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. मधुसुदन पेन्ना आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये पत्रभेट प्रकाशनतर्फे धर्मभास्कर गौरविकेचे प्रकाशनही करण्यात येईल’, असे बरबडे यांनी सांगितले.