उद्योगनगरी ते शिक्षणाची पंढरी

Education
Education

पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-स्कूल... व्हर्च्युअल क्‍लासरूममध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच अपारंपरिक, व्यावसायिक, कौशल्यवृद्धीला चालना देणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०२० वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड शहर हे ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखले गेले, तर आश्‍चर्य वाटायला नको ! 

संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माऊली, श्री  मोरया गोसावी व क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी. शहराचे महापौर, आयुक्‍त असो अथवा पोलिस आयुक्‍त, ते आपल्या संस्थेमधून शिकून बाहेर पडावी, अशी ढोबळ अपेक्षा शिक्षण संस्थांची असते. कारण, त्याला आवश्‍यक असलेले पूरक व योग्य शिक्षण दिल्याचे समाधान संस्थाचालकाला असते. त्याच दृष्टीने प्रत्येक संस्था प्रयत्न करत आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वंकष विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. 

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वांत मोठे साधन आहे. ‘डिजिटल’ युगामुळे शिक्षणाची दिशा बदलून गेल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. आज पिंपरी-चिंचवड शैक्षणिकदृष्ट्या एका वेगळ्या टप्प्यावर येऊन उभे ठाकले आहे. पुण्यातील नामवंत संस्थांनीही त्यांच्या शाखांचा विस्तार शहरात केला आहे. आज शहरात विविध महाविद्यालये, विद्यालये, शैक्षणिक संस्था गुणवत्तेचा मापदंड ठरल्या आहेत. त्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी, पीईएस, कॅम्प एज्युकेशन, रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांचा समावेश आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे शालेय शिक्षणाबरोबरच उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या अनेक संधी शहरात उपलब्ध झाल्या.

पूरक स्पर्धा परीक्षा केंद्र
स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या अनेक संस्थांची मक्तेदारीही पुण्याच्या मध्यवर्ती भागातच आहे.  यासाठी पूरक अशी वसतिगृहे, वाचनाची भूक भागविणारे दर्जेदार वाचनालये, ग्रंथालयेसुद्धा आहेत. दापोडीत अभ्यासिका आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे संस्थांची संख्या व कॉलेजेस वाढायला सुरवात झाली आहे. आर्थिक संपन्नता लाभलेल्या उद्योगनगरीला सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांचीही निश्‍चितच देणगी लाभेल. 

महापालिका शाळांची ‘स्मार्ट’ वाटचाल
वाढत चाललेल्या स्पर्धेत महापालिका शाळाही मागे राहिल्या नाहीत. थरमॅक्‍ससारख्या कंपनीबरोबर टायप करून इंग्रजीच्या शाळा चालविल्या जाताहेत. सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू करून गरिबांचे मुलांना इंग्रजी शिकविले जात आहे. प्रोजेक्‍टरद्वारे ९० टक्के मुलांना शिक्षण दिले जाते. सीबीएसई पॅटर्नवर आधारित आता महापालिका शाळांमध्ये ‘रोबोटिक्‍स’ धडे मिळताहेत. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागानुसार दर्जेदार शैक्षणिक संस्थांच्या शाखांचा विस्तार होतोय. त्यामुळे महापालिकेच्या शाळाही ‘स्मार्ट’ बनल्या आहेत. ‘दत्तक शाळा’ योजनेमुळे शाळांचा दर्जा सुधारतोय.  

मुलांच्या सुरक्षिततेसाठी आरएफआयडी 
गेल्या दोन दशकांत पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक वातावरण सकारात्मकदृष्ट्या पूर्णपणे बदलले आहे. शिक्षण ‘स्मार्ट’होण्यासाठी शिक्षण संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. एसएनबीपी शाळेत मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून पालक, मुले व शाळा यांच्यातील cosmic connection सेवाप्रणालीचा वापर करण्यासाठी cosmic Gate Technology चा वापर सुरू केलेला आहे. विद्यार्थी शाळेत पोचला का? शाळेतून निघाला का? असे पालकांना पडणारे प्रश्‍न सुटण्यासाठी संस्थेने ‘रेडिओ फ्रिक्‍वेन्सी ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला दिले आहे. जीपीएस ट्रॅकिंगची सुविधाही शाळेने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे पाल्याची बस स्टॉपपासून थोड्या अंतरावर येताच पालकांना एसएमएसद्वारे सूचना प्राप्त होते.

शासकीय अभियांत्रिकी 
शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्याचे जुळे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक विस्तार होत आहे. त्याकरिता प्राधिकरणानेदेखील अटी-शर्तीमध्ये बदल करून चांगल्या शैक्षणिक संस्थांना भूखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. प्राधिकरणाकडील चिखलीतील ४० एकर गायरान जागा महसूल विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू होणार आहे. मागील काही वर्षांत नामांकित शिक्षण संस्थांचा शहरात प्रवेश झाला असताना आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे शहराचे महत्त्व वाढणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, तांत्रिक शिक्षणाचे माहेर म्हणून लौकिक मिळवलेल्या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळीसारख्या अनेक संस्था आपल्या नजरेस पडतात. अशा संस्थांमधून खेड्यापाड्यांतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून, अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. असे एक उदाहरण म्हणजे संकेत भोंडवे यासारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त करून प्रशासकीय अधिकारी लाभला. 

झपाट्याने कॉलेजचा विस्तार 
‘शिक्षणाची पंढरी व आयटी हब’ म्हणून शहराची ओळख आहे. शिक्षण व नोकरीनिमित्ताने शहरात देशविदेशांतील मुले-मुली राहत आहेत. अनेक मोठी, नामांकित महाविद्यालये या ठिकाणी आहेत. यशस्वी इन्स्टिट्यूटसारख्या अनेक संस्थांनी ‘कमवा व शिका’योजना सुरू केली. अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या भव्यदिव्य महाविद्यालयाने गुणवत्तेने विद्यापीठात आपला वेगळा लौकिक निर्माण केला. शहरात इंजिनिअरिंग कॉलेज, एमबीए, बी फार्मसी, डी. फार्मसी, वरिष्ठ महाविद्यालये, ज्युनिअर कॉलेजेस, विद्यालये, लॉ कॉलेज व शिक्षणशास्त्र महाविद्यालये, असे शिक्षणाचे मोठे जाळे निर्माण केले आहे. शाळांच्या बरोबरीने कॉलेजांचा विस्तारदेखील अतिशय झपाट्याने झाला. शहरातील सुमारे १५ अभियांत्रिकी संस्थांमधून वर्षाला आठ हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. परिणामी, महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतून तंत्र-वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक नामवंत शिक्षण संस्था, त्यांच्या आकर्षक अन्‌ प्रशस्त इमारती, वैविध्यपूर्ण कोर्सेस, मोठ्या कंपन्यांमध्ये मिळणारी प्लेसमेंटमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हे आवडते शहर झाले आहे. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, इंदिरा इन्स्टिट्यूट, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे शाहू कॉलेज, नॉव्हेल इन्स्टिट्यूट, आयआयबीएमआर, प्रतिभा इन्स्टिट्यूट, एटीएसएस अशा नानाविध संस्थांचा उल्लेख करता येईल. 

इंटरनॅशनल स्कूलला पसंती 
शहराच्या विस्तारानुसार गरजाही बदलू लागल्या. ‘आयटी हब’ नावारूपाला आल्याने गलेलठ्ठ पगाराच्या पालकांनी परदेशातील शिक्षण पद्धतीनुसार व्हर्च्युअल क्‍लासरूम ‘ई-स्कूल’ या संकल्पना अगदी सहजगत्या स्वीकारली. शहरात रूळ लागलेल्या सीबीएसई आणि आयसीएसई, केंब्रिजसारख्या महागडे शिक्षण पालकांना परवडू लागल्याने या शाळा कमालीच्या विस्तारल्या आहेत. त्यामध्ये पोद्दार, सी. टी. प्राइड, सी. टी. इंटरनॅशनल, मर्सिडीज बेंझ इंटरनॅशनल, अभिषेक इंटरनॅशनल, एसएनबीपी स्कूल, जी. जी. इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल या संस्था शहरवासीयांचे आकर्षण बनल्या आहेत. आयटी पार्कच्या परिसरातही अशा संस्थांचा विस्तार वेगाने होत आहे. काही कंपन्या आणि शाळांमध्ये पाळणाघरची सोय असते. त्यामुळे महिलांना अशा संस्था सोयीच्या वाटतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com