Sakal Diwali Pahat : मंगल गावो, बजावो...अन् तसंच झालं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Diwali Pahat

Sakal Diwali Pahat : मंगल गावो, बजावो...अन् तसंच झालं...

पुणे : मंगल गावो...बजावो...आज शुभ दिन आयो...या सावनी शेंडे यांनी सादर केलेल्या ललत रागातील स्वरचित बंदिशीने सुरुवात व जयतीर्थ मेवुंडी यांनी सौभाग्य दा लक्ष्मी बारंमा...या कानडी भजनाने केलेल्या सांगतेने सकाळ आयोजित पाडवा पहाट कार्यक्रम बुधवारी रंगला. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे पुणेकरांसाठी बुधवारी (ता. २६) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘दिवाळी पहाट’ या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जयतीर्थ मेवुंडी व सावनी शेंडे यांच्या सुमधुर संगीताचा सुरेल नजराणा रसिक प्रेक्षकांनी अनुभवला. दिवाळीच्या काळात ‘सकाळ’तर्फे पुणेकरांसाठी होणाऱ्या सांगितिक मैफलीला अनेक वर्षांची परंपरा आहे. या मैफलींना पुणेकरांची आजवर भरभरून दाद मिळाली आहे. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे या मैफलीत खंड पडला होता. आता पुन्हा ही मैफल झाली. कार्यक्रमाचे पॉवर्ड स्पॉन्सर न्याती ग्रुप आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी होते.

सावनी शेंडे यांनी सुरुवातीला सादर केलेली रुपक तालातील मंगल गावो...बजावो...ही बंदिश व नंतर सादर केलेला त्रितालातील तराणा मैफल रंगणार हे सांगून गेली. मूळ नाट्यगीत व तोडी रागातील बंदिश असलेले सोहम् हर डमरू बाजे हे गाणे विशेष दाद मिळवून गेले. अबीर गुलाल उधळीती रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हा पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या अभंगाने व त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची रचना व किशोरी आमोणकर यांनी संगीत रसिकांच्या घराघरात पोचवलेल्या बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे या अभंगाने सावनी शेंडे यांनी मैफलीत रंग भरला. सावनी शेंडे यांची मैफल रंगत असतानाच जयतीर्थ मेवुंडी यांचे रंगमंचावर आगमन झाले व त्यांनीही सावनीताईंबरोबर राम का गुण गान करी हे भजन गाऊन मैफलीची रंगत वाढवली.

उत्तरार्धात कोमल ऋशब आसावरी रागातील सब मेरा वो ही, सकल जगत को पयदा करनेवाला...ही विलंबित बंदिश गाऊन मेवुंडी यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात केली. मै तो तुमारो दास जनम जनम का...दास की इच्छा पुरन करो...ही द्रुत बंदिश सादर करून मेवुंडी यांनी पं. भीमसेन जोशी यांची आठवण करून दिली. दिवाळीत आधारित व स्वरचीत दीपावली शुभ दीपावली...शुभ प्रभात शुभ दीपावली ही आधात्रीतालातील बंदीश त्यांनी सादर केली.

त्यानंत न थांबता लागोपाठ काया ही पंढरी..., इंद्रायणी काठी...,याचसाठी केला होता हट्टाहास...हे अभंग व नंतर बाजे रे मुरलिया बाजे हे हिंदी भजन सादर करून मेवुंडी यांनी रसिकांची दाद मिळविली. पं. भीमसेन जोशी यांच्यामुळे संगीत प्रेमींच्या काळजात घर केलेल्या व कानडी भाषा समजत नसूनही मराठी रसिकांना आवडणाऱ्या सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा...या अभंगाने मेवुंडी यांनी मैफलीची रंगतदार सांगता केली. यावेळी त्यांनी सादर केलेली सरगम रसिकांची दाद मिळवून गेली.

सावनी शेंडे व जयतीर्थ मेवुंडी यांना अभिनय रवांदे (हार्मोनिअम), पांडुरंग पवार (तबला), सुखद जाधव (पखवाज) व केदार घोडके (तालवाद्य) यांनी साथतंगत केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. सकाळचे संपादक सम्राट फडणीस, सरव्यवस्थापक (जाहिरात-विक्री) रुपेश मुतालीक व न्याती ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नीतीन न्याती यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.