सकाळ चित्रकला स्पर्धा 2018 : कल्पनाशक्तीला द्या चालना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास त्यांच्यातील कला जोपासली पाहिजे. कलेच्या माध्यमातूनच त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होऊ शकतो.

अभ्यासाने मुलांचा बौद्धिक हा एकांगी विकास होतो, मात्र कलेने मुलांचा भावनिक, मानसिक, सौंदर्य, संवेदनशीलता, कलास्वाद क्षमता असा परिपूर्ण विकास होतो. त्यामुळे अभ्यासासोबत कलेची जोड आवश्‍यक आहे. मुले चित्र रेखाटत असताना त्यांच्या भावविश्‍वातील आनंद, दुःख, राग, लोभ या सर्व भावनांना वाट मिळते. पालकांनी मुलांना ही संधीच न दिल्यास मुले हट्टी, रागीट, चिडखोर बनतात. विकृत गोष्टी करतात. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

बहुतांश मुले कित्येक तास मोबाईल गेम्स, टीव्ही, कॉम्प्युटर या जाळ्यात अडकली आहेत. सध्याच्या काळातील यंत्रप्रधान संस्कृतीमुळे आपल्या मनावर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी कलेच्या उपासनेची गरज आहे. यासाठी मुलांमध्ये असणाऱ्या विविध कलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. चित्रकलेमुळे मुलांच्या कल्पनाशक्ती, सुप्त भावना, सर्जनशीलता, नवनिर्मिती यांना वाव मिळतो. त्यांच्यातील सौंदर्याभिरूचीचा विकास होतो. निसर्ग व कला यांमध्ये असणाऱ्या सौंदर्याचा आस्वाद घेता येण्याची पात्रता त्यांच्यात निर्माण होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलून येते. ‘सकाळ’च्या राज्यव्यापी चित्रकला स्पर्धेमुळे मुलांना त्यांच्या मनातील भावविश्‍व कागदावर रेखाटण्याची संधी मिळते. 
अमृता भोईटे, कलाशिक्षक.

हे नक्की करा...
      मुलांनो, आपण निवडलेल्या विषयावर चित्र काढताना कॉपी करू नका.
      तुमच्या मनातील कल्पना, सर्जनता यांचा वापर करून प्रथम मनात चित्र रेखाटा.
      मनातील चित्रच कागदावर उतरवा.
      तुम्हाला आवडेल त्या रंगमाध्यमांत रंगांच्या विविध छटांत, शेडिंगचा वापर करून चित्र रंगवून पूर्ण करा.

मी अभ्यास आणि खेळात अग्रेसर होते, पण ‘सकाळ’ने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर मला माझ्यातील चित्रकाराचाही शोध लागला. मी १९९१मध्ये नववीत असताना स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत फोटो फ्रेम हा विषय होता. ‘सकाळ’ने पारितोषिक दिल्याने त्या वेळी माझे हवेली तालुक्‍यात (जि. पुणे) मोठे कौतुक झाले होते. शालेय जीवन आणि महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रात अनेक वेळा सन्मान मिळाला, पण चित्रकलेतील सन्मान कधीही विसरता येणार नाही. 
- सुनीता रिकामे, जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई.

अधिक माहितीसाठी संपर्क
घनश्‍याम जाधव : ९८८१७१८८०४
संतोष कुडले : ९८८१०९८५०९
(सकाळी १० ते सायंकाळी ६)

Web Title: Sakal Drawing competition in maharashtra