पुणेकरांनो, उत्सव करा; पण गर्दी टाळा! 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा 
Friday, 13 November 2020

उत्सवाच्या उत्साहात गर्दी कराल, तर ती साऱ्यांच्या जिवावर बेतू शकते, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे गर्दी न करता सणाचा आनंद द्विगुणित कसा करता येईल, हे पाहा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

पुणे - पुणेकरांनो, दिवाळी साजरी करताय खरी; पण या आनंदाच्या भरात एक गोष्ट विसरू नका! ती म्हणजे कोरोनाने अजून तुमची पाठ सोडलेली नाही. उत्सवाच्या उत्साहात गर्दी कराल, तर ती साऱ्यांच्या जिवावर बेतू शकते, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे गर्दी न करता सणाचा आनंद द्विगुणित कसा करता येईल, हे पाहा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

पुण्यात ऑगस्टअखेरपर्यंत कोरोनाच्या साथीचा धुमाकूळ सुरू होता. या काळात एका दिवसात सव्वादोन हजार रुग्ण सापडल्याची आकडेवारी आहे. त्याआधीही काही दिवस याच प्रमाणात रुग्णसंख्या होती. परिणामी, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचे हाल झाले. काहींना उपचाराविना जीव सोडावा लागला. आता गेल्या महिनाभरापासून साथ आटोक्‍यात येत असल्याचे चित्र असून, नव्या रुग्णांचा रोजचा आकडा दीडशेपर्यंत खाली आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, आता दिवाळीमुळे बाजारपेठांत गर्दी वाढली आहे. गर्दी करताना योग्य रीतीने मास्क न घालण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे. त्यामुळे आटोक्‍यात आलेला कोरोना पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुन्या म्हणजे सर्वाधिक रुग्णसंख्येत 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज आरोग्य खात्याचा आहे. म्हणजे पुढच्या काही दिवसांत रोज नवे अडीच हजार रुग्ण सापडू शकतात, हेही सांगण्यात आले आहे. दीड-दोन हजार रुग्णांना उपचार व्यवस्था पुरविण्यात अडचणी आल्या होत्या. आता रुग्णसंख्या वाढल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यातील गर्दी पाहता पुढील 14 ते 28 दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले. 

आठवड्यातील रुग्णसंख्या 
6 नोव्हेंबर - 241 
7 नोव्हेंबर  - 169 
8 नोव्हेंबर - 217 
9 नोव्हेंबर - 160 
10 नोव्हेंबर - 185 
11 नोव्हेंबर  -217 
12 नोव्हेंबर  - 279 
सध्याच्या रोजच्या तपासण्या 
2500 ते 2700 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यांत जुन्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रोज अडीच हजार रुग्ण सापडतील आणि "ऍक्‍टिव्ह' रुग्णांची संख्या वीस हजारांपर्यंत जाईल. सध्याच्या गर्दीमुळेच हे आकडे वाढतील. मात्र त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार व्यवस्था असेल. 
-रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 

कोरोनाच्या एका रुग्णामागे पंधरा जणांची तपासणी केली जात आहे. आता गर्दीत जवळचा संपर्क वाढल्याने तपासण्या वाढवाव्या लागणार आहेत. उत्सव साजरा करताना शक्‍यतो घरगुती कार्यक्रम टाळावेत. 
-डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal exclusive news Celebrate festival But avoid crowds