esakal | आला आला चोर नको वन्समोर...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

आला आला चोर नको वन्समोर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सु. ल. खुटवड (९८८१०९९०९०)

बायको माहेरी गेल्यापासून ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ या प्रश्नाला ‘मी आहे’ असे उत्तर समीर देत आहे. सध्या ‘अहो उठा’चा गजर होत नसल्याने कधीही उठावे, कितीही वेळ लोळत पडावे, फेसबुक, व्हॉटसअपवर कितीवेळ पडीक राहावे, जाब विचारणारे कोणी नसल्याने समीरला मोकळे रान मिळाले होते. त्यात उशीरापर्यंतच्या पार्ट्याही आल्याच. अशाच एका पार्टीवरून समीर मित्रांसोबत रात्री एकच्या सुमारास घरी आला. मात्र, दरवाजा उघडा पाहून, बायकोच माहेरवरून आली आहे, असा त्याचा समज झाला व अंधारातच सरळ लोटांगण घालून ‘बायको, आय ॲम सॉरी. व्हेरी सॉरी’ असे म्हणू लागला. मात्र, या प्रकारामुळे हॉलमध्ये उचकापाचक करणारा चोर भांबावून गेला. तेवढ्यात एका मित्राने प्रसंगावधान राखत लाइट लावली. त्यावेळी थरथर कापणारा चोर त्यांना दिसला. समीरसोबत त्याचे तीन-चार आडदांड मित्र पाहून त्याची बोबडीच वळली.

‘‘साहेब, मला माफ करा. मी ट्रेनी चोर आहे. मला मारू नका. वाटल्यास मला पोलिसांच्या ताब्यात द्या,’’ असं तो हात जोडून विनवणी करू लागला. त्याच्या तोंडून ‘मला पोलिसांच्या ताब्यात द्या’ हे शब्द ऐकताच समीरच्या अंगाला दरदरून घाम फुटला. घशाला कोरड पडली व तो मटकन सोफ्यावर बसला. थोड्यावेळाने त्याने स्वतःला सावरले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

‘‘चोरसाहेब, मीच तुमची माफी मागतो. बायको माहेरी गेल्याने सगळे दागिने ती बरोबर घेऊन गेली आहे. तसेच घरात चोरण्यासारखे काही नाही. त्यामुळे तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल दिलगीर आहे.’’ समीरने हात जोडून म्हटले. त्याचं हे बोलणे ऐकून मित्र तर चक्रावलेच शिवाय चोरानेही अंग चोरून घेतले. मग समीरने एक हजार रुपये व टॉवेल-टोपी देत पहिल्या चोरीनिमित्त त्याचा सत्कार करून, त्याची पाठवणी केली. ‘‘समीर, तुझी अजून उतरली नाही का?’’ असा प्रश्न विचारून समीरला मित्रांनी वेड्यात काढलं. त्यावेळी त्याने एक दीर्घ उसासा सोडत मागे घडलेला एक प्रसंग ऐकवला. समीर म्हणाला, ‘‘गेल्या महिन्यात मी पीएमपी बसमध्ये पाकीटमाराला जाग्यावर पकडले. त्याला घेऊन मी पोलिस ठाण्यावर गेलो. चोराला पकडले म्हणून पोलिस आपल्याला शाबासकी देतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र, ‘‘काऽऽय हेऽ ऽ’’ असं म्हणून एक पोलिस माझ्यावरच खेकसला. मी चोराला पकडल्याचं सांगितल्यावर ‘चोरांना पकडण्याचं काम पोलिसांचं आहे ना? मग दुसऱ्यांच्या कामात कशाला नाक खुपसता?’ असं ओरडत मला कोपऱ्यात बसवलं.

हेही वाचा: नगर जिल्ह्यात कोरोनाच्या १० रुग्णांचा मृत्यृ; नवीन ७८४ बाधित

एकाच जागी तीन-चार तास बसल्यावर मी वैतागलो. चोर मात्र आपलंच घर आहे, असं समजून तिथं बिनधास्त वावरत होता. ‘तेवढी फिर्याद तरी घ्या’ या माझ्या विनंतीला, ‘आम्हाला तेवढीच कामं आहेत का? साहेब येईपर्यंत गपगुमान बसा.’ असा दम दिला. त्यानंतर मला समोरच्या हॉटेलमधून नाश्ता व चहा आणायला सांगितला. त्याचं बिलही मीच भरले. सायंकाळी सहापर्यंत फिर्याद न घेतल्याने मला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावलं. पण साहेब राऊंडला गेलेत, असं म्हणून परत थांबवून घेतलं. दुपारी मला मटण बिर्याणीचं पार्सल आणायला सांगितलं. संध्याकाळी पुन्हा चहा- नाश्‍ता घेऊन आलो. दिवसभरात माझे दोन हजार रुपये खर्च झाले. तिसऱ्या दिवशी मी पोलिस ठाण्यात गेल्यावर चोराला पकडण्यासाठी आम्हाला बाहेरगावी जावं लागेल, असं म्हणून पाच हजारांची मागणी केली.

‘‘अहो साहेब, मीच चोराला पकडलंय,’’ असं सांगितल्यावर तो पोलिस चपापला. चहा- पाण्यासाठी काहीतरी द्यावं लागंल तरच फिर्याद घेऊ, असं त्यानं सांगितले.

‘साहेब, दररोज मी तुम्हाला चहा- पाणी करतोय. अजून कशाला वेगळं.’ मी खुलासा केला पण पोलिस ऐकायला तयार नव्हते. शेवटी आयुष्यात कधीही पोलिस ठाण्याची पायरी चढणार नाही, अशी प्रतिज्ञा करून मी घरी परतलो.’’ ही कहाणी मित्रांना ऐकवल्यानंतर समीर म्हणाला, ‘‘आता तुम्हीच सांगा, मी चोराला पोलिसांत दिलं नाही, हे चांगले केले की वाईट.! ’’

loading image
go to top