Sakal-Saam Survey : मविआवर सर्वाधिक परिणाम; पक्षाध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक पसंती

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याबाबतीत सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असलेली संदिग्धता कमी झालेली नाही.
sakal saam survey 2023 maharashtra politics sharad pawar ncp supriya sule maha vikas aghadi
sakal saam survey 2023 maharashtra politics sharad pawar ncp supriya sule maha vikas aghadi टिम ई सकाळ
Summary

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याबाबतीत सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असलेली संदिग्धता कमी झालेली नाही.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचा सर्वाधिक परिणाम महाविकास आघाडीवर झाला असल्याचे ‘सकाळ’ आणि साम टीव्हीने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्टपणे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याबाबतीत सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असलेली संदिग्धता कमी झालेली नाही.

भाजपसोबतच्या संभाव्य आघाडीबद्दल अजित पवार यांनी वारंवार इन्कार केला आहे; तथापि सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपसोबत जुळवून घेतले, तरी महाराष्ट्रात राजकीय स्थिरता येऊ शकेल, असे राजकीय क्षेत्रात वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य पक्षाध्यक्षासाठी सर्वेक्षणातील सर्वाधिक लोकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाजूने कौल दिला आहे.

पवार यांनी दोन मे रोजी मुंबईतील कार्यक्रमात आपल्या आगामी वाटचालीची दिशा सांगितली. त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातच ही घोषणा त्यांनी केली. उपस्थित कार्यकर्त्यांसह राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना हा मोठा धक्का होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा कल ''सकाळ'' आणि साम टीव्हीने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आला. दोन आणि तीन मे रोजी हे सर्वेक्षण करण्यात आले.

पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या आणि नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या निर्णयाबद्दल बहुमत सकारात्मक असले, तरी ते एकतर्फी नाही. ४७.५ टक्के लोकांना पवारांचा निर्णय योग्य वाटतो आहे. त्याचवेळी ४५.९ टक्के लोकांना हा निर्णय योग्य वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवगळता अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मते (५६.१ टक्के) निर्णय योग्य आहे. अजित पवारांच्या राजकारणाभोवतीच्या संभाव्य शक्यतांवर आधारित प्रश्नांना सर्वेक्षणातून थेट उत्तरे आली आहेत. शरद पवारांचा निर्णय अजित पवारांच्या संभाव्य राजकीय हालचालींना अटकाव करण्यासाठी आहे, अशी एक शक्यता दोन मेपासून मांडली जात आहे. तसे राजकीय कार्यकर्त्यांना वाटत नाही. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ४१ टक्के लोकांना पवारांचा निर्णय दबावतंत्राचा भाग वाटत नाही.

महाराष्ट्रात २०१९ पासून तीन सरकार स्थापन झाली आहेत. राज्याच्या इतिहासातील हे अस्थैर्याचे पर्व असल्याचे सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालाची टांगती तलवार एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर आहे. या निकालाच्या शक्यतांमध्ये शिंदे अपात्र ठरल्यास महाराष्ट्रात पुन्हा राजकीय अस्थैर्य निर्माण होईल, असे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर अजित पवार भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी गेल्यास महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळू शकते का, हा प्रश्न राजकीय कार्यकर्त्यांना सर्वेक्षणात विचारण्यात आला. मात्र, अशा युती-आघाडीतून महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार नाही, असे उत्तर तब्बल ५९.६ टक्के लोकांनी दिले. भाजप अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी देणार नाही, असे सर्वेक्षणात सहभागी ४४.७ टक्के लोकांचे मत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य पक्षाध्यक्षाबद्दलच्या प्रश्नावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून जवळपास समान कल आहे. खासदार सुळे यांना ३५.२ टक्के कार्यकर्त्यांची पसंती आहे, त्याखालोखाल ३२.१ टक्के पसंती अजित पवार यांना आहे. पवार कुटुंबाबाहेरील संभाव्य पक्षप्रमुखांना उल्लेखनीय पसंती मिळालेली नाही.

दिवसभरात

  • शरद पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये बॅनर

  • जितेंद्र आव्हाड यांनी सरचिटणीसपद सोडले

  • मुंबईत पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर

  • राष्ट्रवादीतील गटबाजीचा जयंत पाटलांकडून नकार

  • मला अध्यक्ष होण्यात रस नाही ः प्रफुल्ल पटेल

  • पक्ष प्रतोद अनिल पाटील यांचा राजीनामा

  • अध्यक्षपदाबाबत पाच मेच्या बैठकीत निर्णय शक्य

  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल?

  • अजित पवार

  • सुप्रिया सुळे

  • जयंत पाटील

  • इतर

शरद पवार यांच्या या निर्णयामुळे मविआवर परिणाम होईल, असे वाटते का?

  • नक्कीच होईल

  • होणार नाही

  • सांगता येत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com