"सकाळ'च्या "शब्ददीप' दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा रंगतदार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

आनंदाची दिवेलागण आणि प्रकाशाचे उज्ज्वल पर्व म्हणजे दीपावली. या सणाच्या आखीव-रेखीव रांगोळीत एक रंग साहित्याचा. या रंगाने सजलेला रंगीबेरंगी कॅनव्हास म्हणजे "सकाळ'चा शब्ददीप दिवाळी अंक. या अंकाचा प्रकाशन सोहळाही आज रंगतदार झाला.

पुणे - आनंदाची दिवेलागण आणि प्रकाशाचे उज्ज्वल पर्व म्हणजे दीपावली. या सणाच्या आखीव-रेखीव रांगोळीत एक रंग साहित्याचा. या रंगाने सजलेला रंगीबेरंगी कॅनव्हास म्हणजे "सकाळ'चा शब्ददीप दिवाळी अंक. या अंकाचा प्रकाशन सोहळाही आज रंगतदार झाला. मराठी चित्रपट, मालिकांमध्ये विविधरंगी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या आठवणी आणि अनुभवांच्या खुमासदार किश्‍श्‍यांनी या सोहळ्याला सोनेरी किनार जोडली. 

आपटे रस्त्यावरील "ग्रीन सिग्नल' हॉटेलमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमाला आरजे संग्राम याने त्यांच्या शैलीदार संवादातून रुपेरी पडद्यावरील तारे-तारकांची फिरकी घेत हास्याचे उधाण आणले. दिग्दर्शक अजय नाईक आणि गायिका सावनी रवींद्र यांनी दिवाळी हा आपला सांस्कृतिक वारसा आणि हवाहवासा वाटणारा सण असल्याचे सांगितले. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी, मी दिवाळीचा फराळ खात नाही. आमच्या डायटमध्ये ते बसत नाही, असे सांगत आपला रांगडा बाणा दाखवून दिला. निर्माती अश्‍विनी दरेकर यांनी, मोठ्या आवाजाचे नाही; पण आकाशातील फटाक्‍यांची आतषबाजी आवडत असल्याचे सांगितले. अभिनेत्री भाग्यश्री देसाई, ज्ञानदा रामतीर्थकर, वर्षा घाटपांडे, रीना लिमण यांच्यासह इतर कलाकारांनी विविध किस्से सांगितले. 

"सकाळ'चे संचालक भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, "एचआर' प्रमुख तुलसी दौलतानी, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांच्यासह दिग्दर्शक अक्षय दत्त, अभिनेता योगेश देशपांडे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, बिपिन सुर्वे, ऍड. केदार सोमण, अभिनेत्री राधिका देशपांडे, प्रियांका यादव, प्रीतम कांगणे, विनोद सातव यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा रंगला. 

पूर्वी "सकाळ'बरोबर प्रकाशित होणारा "शब्ददीप' हा दिवाळी अंक पूर्ण रंगीत स्वरूपात बघताना खूप छान वाटतो आहे. त्यातील आशय आणि विविध विषय हे वाचकांना दिवाळीची गोडी वाढविणारे ठरतील. 
- अमित मोडक,  संचालक-सीईओ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. 

सलग दुसऱ्या वर्षी "शब्ददीप'चे प्रकाशन आमच्या हॉटेलमध्ये होत असल्याचा आनंद होत आहे. खरंतर ही आमच्यासाठी संधीच आहे. "सकाळ'ने नेहमीच चित्रपटसृष्टीला पाठिंबा दिला असून हे संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत. 
- रणजित गुगळे,  चित्रपट निर्माते व संचालक, हॉटेल ग्रीन सिग्नल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Shabdadeep Diwali Ank 2019 Publishing Ceremony

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: