वास्तूकडून सकारात्मक प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

‘वास्तुशास्त्र हे दिशा आणि पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. प्रत्येक मानवातदेखील पंचमहाभूते सामावलेली आहेत, त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा. सकारात्मकता ठेवल्यास वास्तूदेखील त्याला प्रतिसाद देते,’’ असे मत वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी - ‘वास्तुशास्त्र हे दिशा आणि पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. प्रत्येक मानवातदेखील पंचमहाभूते सामावलेली आहेत, त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा. सकारात्मकता ठेवल्यास वास्तूदेखील त्याला प्रतिसाद देते,’’ असे मत वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहातर्फे ऑटोक्‍लस्टर येथे आयोजित ‘गृहमुहूर्त’ या वास्तूविषयक प्रदर्शनानिमित्त ‘आपली वास्तू- आनंदी वास्तू’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. स्लाइड-शोद्वारेदेखील पिंपळकर यांनी वास्तुशास्त्राची माहिती दिली.  

पिंपळकर म्हणाले, ‘‘प्रत्येक वास्तूत गणपती आणि नवदुर्गांचे वास्तव्य असते. ३३ कोटी म्हणजे ३३ स्तरांच्या देवी-देवता घरात अस्तित्वात असतात. सर्व पंचमहाभूतांइतकेच ताकदीचे छोटे स्वरूप म्हणजे मानव होय. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पाचही तत्त्वे शरीरात असतात, त्यामुळे तुमची पंचमहाभूते बिघडू देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार नसलेली वास्तूही चांगली राहते. वास्तुशास्त्रानुसार त्या त्या दिशेला तेथील तत्त्व निर्माण करायला हवे. मात्र, वास्तुशास्त्राचा अगदीच बाऊ करता कामा नये. वास्तुशास्त्राचे उपाय केल्यास पैशांचा पाऊस पडतो किंवा आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होते असे नव्हे. स्वतःतील पंचतत्त्वे वास्तूतील पंचतत्त्वांशी एकरूप झाली पाहिजेत. मनातील विचार चांगले ठेवा. स्वतःची मनःशक्ती वाढवा.’’

नवरात्रोत्सवानिमित्त कुमारिका पूजन करण्यात आले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर यांनी स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vastu Expo 2019 Anand Pimpalkar