
किमती वाढण्याआधी व्हा घरमालक!
पुणे - देशातील अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बांधकाम क्षेत्रालादेखील आता महागाईचा झटका सहन करावा लागत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत गेल्या दीड वर्षांत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकामाचा प्रतिचौरस फूट खर्च ५०० ते ७०० रुपयांनी वाढला आहे. आतापर्यंत हा वाढलेला खर्च बांधकाम व्यावसायिक स्वतः सहन करीत होते. मात्र, नवीन प्रकल्प सुरू करत असताना व्यावसायिक वाढलेल्या साहित्याच्या किमतीचादेखील विचार करीत आहेत. त्यामुळे वास्तूंच्या किमती वाढण्यापूर्वीच ती विकत घेऊन घरमालक होण्याची सुवर्णसंधी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’द्वारे मिळत आहे.
तयार सदनिकाही महागण्याची शक्यता
कोरोनाकाळात बांधकाम साहित्याची उपलब्धता आणि कामगार मिळत नसल्याने अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम थांबले होते. परिणामी, अनेक प्रकल्प उशिरा पूर्ण झाले. तर नवीन प्रकल्प पूर्णतः थांबले होते. त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या वास्तू विकत घेण्याचा पर्याय ग्राहकांकडे होता. मात्र, साहित्याच्या दरवाढीमुळे आता न विकलेल्या सदनिका महागणार आहेत, असा अंदाज ‘क्रेडाई’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या सर्व्हेत व्यक्त केला आहे.
बांधकाम क्षेत्रातील सद्य:स्थिती
बांधकाम साहित्याचे दर ४० टक्क्यांनी वाढले
प्रति चौरस फूट बांधकाम ५०० ते ७०० रुपयांनी महागले
नवीन प्रकल्प लॉन्च होण्यास सुरुवात
कोरोनापूर्वी बांधकाम सुरू झालेल्या वास्तूंचे दर स्थिर
नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या किमती वाढत आहेत
येत्या काळात मोठी दरवाढ होण्याची शक्यता
घरखरेदीची हीच योग्य वेळ
घरखरेदीवर कमी व्याजदर, बांधकाम व्यावसायिक देत असलेल्या ऑफर अशी परिस्थिती एका बाजूला आहे, तर दुसरीकडे बांधकामाची किंमत वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता किमती वाढण्याच्या आधीच नागरिकांनी आपली वास्तू खरेदी करावी, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.