
‘सकाळ वास्तू एक्स्पो’करणार घराची स्वप्नपूर्ती
पुणे - घराबाबत असलेल्या नागरिकांच्या असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करीत स्वप्नातील घरांची पूर्ती करण्याच्या उद्देशाने ग्राहकांसाठी सकाळ माध्यम समूहाच्यावतीने दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो-२०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे शनिवारी (ता. ३०) विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या एक्स्पोच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे, असा विश्वास मान्यवरांनी या वेळी व्यक्त केला.
‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, ‘महाऊर्जा’चे महासंचालक रवींद्र जगताप, अवधूत कन्स्ट्रक्शनचे शैलेश टिळक, ‘नंदन बिल्डकॉन’चे विक्री आणि विपणन व्यवस्थापक रोहन कोतकर, ‘अर्बन इस्टा’चे आशिष कुंबरे, ‘बेलवलकर हाउसिंग’च्या व्यवसाय विकास विभागाचे व्यवस्थापक नकुल बेलवलकर, ‘एएससीआय’ सल्लागार संगीता पेंढारकर, ‘महाऊर्जा’च्या महाव्यवस्थापक सुवर्णा हुंडेकरी, विनोद शिरसाट, प्रकल्प अधिकारी रोहिणी पाटील, व्यवस्थापक अमित चिलवे, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव आणि संपादक सम्राट फडणीस या वेळी उपस्थित होते.
या प्रसंगी माने म्हणाले, ‘घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना चांगली संधी ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून अनेकांची स्वप्नपूर्ती होर्इल. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ‘सकाळ वास्तू’ला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’ जगताप म्हणाले, ‘एकाच छताखाली घराचे अनेक पर्याय ‘सकाळ’च्या उपक्रमातून उपलब्ध झाले आहे. त्यामुळे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे आहे. प्रदर्शनास आमचे नेहमी सहकार्य असेल. या माध्यमातून व्यावसायिकांचीदेखील पुढील वाटचाल सोपी होर्इल. येत्या काळात आपल्याला वीज वाढविण्यावर आणखी भर द्यायचा आहे.’ तर टिळक म्हणाले, ‘या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना घराचे अनेक पर्याय मिळतील.
त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांना त्यांच्या घराचे स्वप्न साकार करता येर्इल. ग्राहक आणि विकसक यांच्यातील नाते या निमित्ताने आणखी घट्ट होऊन ऋणानुबंध वाढीला लागतील, असा विश्वास आहे.’ मनीष गोखले यांनी सूत्रसंचालन केले.