श्रीक्षेत्र तुळापूर येथे शंभूभक्तांची गर्दी

शरद पाबळे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने श्री शंभू राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. राज्यभरातून शंभूभक्त उपस्थित होते.

 

कोरेगाव भीमा (पुणे) : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने श्री शंभू राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. राज्यभरातून शंभूभक्त उपस्थित होते.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांच्यासह प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, आमदार अशोक पवार, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाऊसाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते. या वेळी विविध मान्यवरांना गौरविण्यात आले. यामध्ये जिजाऊ गौरव पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, शंभूगौरव पुरस्कार स्वीडनचा किल्लेप्रेमी पीटर व्हॅन गेट, समाजगौरव पुरस्कार रामकृष्ण सातव पाटील, शंभूगौरव पुरस्कार शंकरराव बोरकर, बहुजन नायक पुरस्कार पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे तसेच लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, ऍड. शंकर महाराज शेवाळे, संभाजीशेठ पाटील, स्वामीराज भिसे, गणेश कुटे, जयंत पाटील, शशिकांत मोरे, संभाजी आहेरराव, विष्णू सालपे, शिवज्ञा व्हेंचर्स, तेजस्विनी सामाजिक संस्था, संभाजी पाटील, जय शंभूराजे मित्रपरिवार आदींनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक पडळकर, बाळासाहेब गाडेकर, ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे आदींचाही सन्मान झाला.

पालखी मिरवणुकीनंतर तुळापूरचे सरपंच रूपेश शिवले व उपसरपंच राहुल राऊत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा झाला. खासदार संभाजीराजे यांनी पीटर व्हॅन गेट यांच्या अभिमानास्पद अशा दुर्गभ्रमंतीचे कौतुक केले.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरून 200 दुर्गभ्रमण केलेले मूळचे बेल्जियमचे किल्लेप्रेमी पीटर व्हॅन गेट यांनी सत्कारानंतर मराठीत भाषण करीत येथील सुवर्णक्षणाचे अनुभव आपल्या देशात अभिमानाने सांगणार असल्याचे सांगितले. शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले.

संजय राऊत यांच्यावर टीका, इशारा
सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेचे हनन झाल्याचीही खंत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. गोयललिखित मोदींवरील पुस्तक प्रकरण तसेच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. आमदार नीतेश राणे यांनीही राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. "आमच्या नादी लागू नका; अन्यथा शिव-शंभूप्रेमी चोख उत्तर देतील,' असा इशारा त्यांनी दिला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambaji Maharaj Coronation Day Ceremony In Tulapur