साध्वी प्रज्ञाची जीभ छाटली पाहिजेः संभाजी ब्रिगेड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे.

पुणे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी 'फेसबुक'वर पोस्ट लिहून दिली आहे.

भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. सर्व स्तरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

'मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह साध्वी आहे. अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा साध्वीचा हात आहे. ही देशद्रोही व्यक्ती भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी 'भाजप' देते व ती घेते हे या देशाचे दुर्दैव आहे. भाजपचा खोटा देशभक्तीचा भुरका आज प्रज्ञा सिंह साध्वीने टरा-टरा फाडून टाकलेला आहे. अशा देशद्रोही व्यक्तीचे भाजप नेते व पंतप्रधान उमेदवारी देऊन समर्थन करतात हे या देशांमध्ये हिटलरशाही प्रस्थापित करण्याचे उत्तम उदाहरण आहे,' असा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला आहे.

भोपाळमध्ये बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, 'मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्याविरोधात पुरावे नसतानाही हेमंत करकरेंनी हेतुपूरस्कपणे कारवाई केली. मी म्हटले होते की, तुझा सर्वनाश होणार, बरोबर सव्वा महिन्यांनी सुतक लागले. ज्या दिवशी मी आत गेले त्यावेळी सुतक लागले. आणि बरोबर सव्वा महिन्यानंतर ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला (हेमंत करकरे) मारले, त्या दिवशी सुतक संपले.'

दरम्यान, प्रज्ञा सिंह साध्वीच्या या वादग्रस्त वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.

Web Title: Sambhaji Brigade reaction on Sadhvi Pradnya Singh thakur controversial statement