पुन्हा चेतला आकांक्षांचा दिवा! 

संभाजी पाटील
Sunday, 15 November 2020

दिवाळीच्या सणाने पुन्हा एकदा आशेचा किरण जागवत वातावरणात चैतन्य आणले आहे. आता तेवलेले हे दिवे आणि सुरू झालेले आर्थिक चक्र अधिक वेगवान कशी फिरेल, यालाच अधिक प्राधान्य द्यावे लागेल. 

सर्व प्रकारची नकारात्मकता आणि अंधारावर मात करीत चैतन्याच्या ज्योती चेतविण्याची ताकद दीपोत्सव अर्थात दिवाळीत आहे. आठ महिन्यांच्या कोरोनाच्या भयंकर संकटानंतर आणि एक क्षणाला सर्व काही थांबले, अशी स्थिती असताना दिवाळीच्या सणाने पुन्हा एकदा आशेचा किरण जागवत वातावरणात चैतन्य आणले आहे. आता तेवलेले हे दिवे आणि सुरू झालेले आर्थिक चक्र अधिक वेगवान कशी फिरेल, यालाच अधिक प्राधान्य द्यावे लागेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात यंदाची दिवाळी कशी आहे? असे कोणी विचाराल तर त्याला तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता किंवा बोहरी आळीत आवर्जून चक्कर मारण्यास सांगा. थोडक्‍यात नुसतं "न्यू नॉर्मल' नाही तर अगदी गेल्या वर्षीची "नॉर्मल' परिस्थिती असावी, तसे चित्र निर्माण होत आहे. गेल्या आठ महिन्यांतील परिस्थितीचे परिणाम भयंकर झाले आहेत. या काळात बसलेला फटका आणि झालेले नुकसान भरून न येणारे आहे; पण तीन महिन्यांपूर्वी शुकशुकाट असणाऱ्या बाजारपेठांमध्ये ग्राहक फिरकतील, की नाही अशी चिंता सर्वांनाच सतावत होती. त्या पार्श्‍वभूमीवर खरेदीसाठी होणारी गर्दी, बाजारपेठेतील चैतन्य, व्यापारातील वृद्धी या बाबी निश्‍चितच मरगळ झटकणाऱ्या आणि "अब हम नही रुकनेवाले' हा संदेश देणाऱ्याच ठरल्या आहेत. 

असा होतोय बदल 
- स्थानिक खरेदीवर भर 
- छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी यांची नवी साखळी 
- स्थानिक, घरगुती व्यावसायिकांची "ग्लोबल'कडे झेप 

आपल्याकडील प्रत्येक सणाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्यामुळेच हे सण हवेहवेसे, अर्थचक्राला बळ देणारे आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवे करण्याची उमेद देणारे ठरतात. दिवाळी हा सर्वांत मोठा आणि अगदी छोट्या झोपडीपासून महलापर्यंत साजरा होणारा एकमेव सण. सुदैवाने देशातील आणि पुण्यातील कोरानाचे संकट गेल्या महिन्यापासून कमी झाले आहे. रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. अशा वेळी योग्य ती काळजी घेऊन बंद पडलेली आर्थिक चक्रे कशी फिरतील, असाच प्रत्येकाचा प्रयत्न होता. सरकारने या काळात 95 टक्के निर्बंध शिथिल केल्याने दिवाळीत उद्योग-व्यवसायांना गती घेता आली. कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. खर्चाची पद्धत बदलली, खरेदीचे पॅटर्न बदलले. एकमेकांना मदत करण्यासाठी अर्थव्यवस्थेची चक्रे फिरली पाहिजेत, या हेतूने मध्यम वर्ग, नोकरदार खरेदीसाठी बाहेर पडला. त्याने खरेदी करताना "ग्लोबल' पण "ग्लोकल' हा दृष्टिकोन ठेवला. आपल्या गरजेच्या वस्तू स्थानिक व्यावसायिक, घरगुती उत्पादक यांच्याकडूनच जाणीवपूर्वक खरेदी केल्या. अगदी सजावटीच्या विद्युतमाळेपासून चपलेपर्यंत स्थानिक चांगला माल दिसला तर तो खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर होता. कोरोनानंतर झालेला हा बदल खरोखरच महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थानिक खरेदीदारांकडून खरेदीचे आवाहन केले. त्याआधीपासूनच ग्राहकांनी अशा खरेदीला प्राधान्य दिले होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थव्यवस्थेला आता अधिक चालना देण्यासाठी स्थानिक व्यावसायिक हाच केंद्रस्थानी ठेवावा लागणार आहे. त्याला स्थानिक बाजारपेठ मिळाली, विक्रीची ऑनलाइन व्यवस्था तयार झाली तर कोरोना किंवा तशा प्रकारचे कोणतेही संकट आले तरी आतासारखी परिस्थिती ढासळणार नाही. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आपली धोरणे आखताना, अर्थसंकल्पाची मांडणी करताना या गोष्टींचा विचार करावा लागेल. "सकाळ'नेही हाच दष्टिकोन ठेवून "3 के. एम.' सारखी अत्याधुनिक; पण स्थानिक व्यवसायांना उन्नत करणारी यंत्रणा उभी केली आहे. हजारो छोट्या व्यावसायिकांनी त्यास प्रतिसाद देऊन व्यवसायवृद्धीसाठी एक पाऊल उचलले आहे. स्थानिक, घरगुती व्यवसायांची ही साखळी अर्थव्यवस्थेला मजबुती तर देईलच; पण कोरोनासारख्या कोणत्याही संकटाचा सामना करण्याची क्षमताही त्यांच्यात असेल. त्यामुळेच यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने अंधारमय वातावरण दूर करून नव्या आशा-आकांक्षांचा दीप पेटवणारी ठरेल. अर्थात सर्व प्रकारची काळजी घेऊनच. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji patil write article Diwali has the lamp of aspirations