
रस्त्यावर एक पोलिस उभा असला तरी आधी भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरत असे. कायद्याविषयी असणारा आदर, पोलिसांचा वचक आणि चुकीचे वागल्यास निश्चित कारवाई होईल, हा सर्वसामान्यांच्या मनात असणारा विश्वास यामुळे हे घडत होते.
रस्त्यावर एक पोलिस उभा असला तरी आधी भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरत असे. कायद्याविषयी असणारा आदर, पोलिसांचा वचक आणि चुकीचे वागल्यास निश्चित कारवाई होईल, हा सर्वसामान्यांच्या मनात असणारा विश्वास यामुळे हे घडत होते. मात्र गुन्हेगारीचे आणि गुन्हेगारांचे उदात्तीकरण, त्यांना राजकीय पक्षांकडून मिळणारे संरक्षण, पोलिसांची ढिलाई, यामुळे गुंड होणे ही बाब प्रतिष्ठेची बनली आहे. सहाजिकच सर्वसामान्य माणसाला कायद्याकडून मिळणाऱ्या संरक्षणाची खात्री उरली नाही. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचकही कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात एका बाजूला पोलिस प्रशासनाने जीव ओतून काम केले. नागरिकांना सर्व प्रकारची मदत केली. त्यांच्या या प्रयत्नांचे नागरिकांनी भरभरून कौतुकही केले, मात्र दुसरीकडे गुन्हेगारीवर असणारी पोलिसांची पकड सैल होत असल्याची उदाहरणेही पुण्यात पाहायला मिळाली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चोरट्यांना पाहून पोलिस पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आलिशान मोटारी उडवत तुरुंगातून सुटलेला गुंड मिरवणूक काढतो, हे सहाजिकच पोलिसांना मान खाली घालायला लावणारी घटना आहे. पुणे हे सर्वात सुरक्षित आणि देशात राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठीच देशभरातून पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवण्यास प्राधान्य देतात. हजारो ज्येष्ठ नागरिक एकटे पुण्यात वास्तव्य करतात. रात्री १२ नंतरही दुचाकीवरून घरी जाणाऱ्या अनेक महिला आजही रस्त्यावर दिसतात. याला पुण्यातील सुरक्षित वातावरण जबाबदार आहे.
पुण्यात टोळीनं सामान्यांना लुटणारी गँग गजाआड; 'मोक्का'अंतर्गत कारवाई
मात्र गेली काही वर्षांपासून जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार, खंडणी, ''टीडीआर''ची विक्री आदींमधून गुंडगिरीची नवी जमात तयार झाली आहे. त्यांना राजकीय पक्षांनीच प्रतिष्ठा दिली. त्यामुळे हे गुंड बेफिकीर झाले असून, वर्चस्व वाढवण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मिरवणुका काढण्याचे धाडस करू लागले आहेत. गेल्याच महिन्यात येरवडा कारागृहातून सुटलेल्या एका गुंडाचे त्याच्या समर्थकांनी फटाके उडवून स्वागत केले. या घटनांमुळे सर्वसामान्य माणूस हादरला आहे.
'जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी...'; शरद पवारांनी बारामतीकरांना दिला कानमंत्र
एका बाजूला सिग्नलपासून न दिसणाऱ्या जागेवर उभे राहून टोळक्याने कारवाई करणारे वाहतूक पोलिस, पोलिस ठाण्यात गेल्यानंतर सर्वसामान्यांच्या तक्रारीची वेळीच दखल न घेणे असे प्रकार असताना गुंडांना मात्र सर्व मोकळीक अशी सर्वसामान्यांची भावना वाढत आहे. पोलिसांविषयी तयार होणारे हे मत बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उघड-उघड दिसणाऱ्या गुंडगिरीला आळा घालणे हा आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुण्यात सूत्रे स्वीकारल्यानंतर अशा ''व्हाइट कॉलर'' गुंडगिरीला चाप लावण्यासाठी काही कारवाई निश्चित केली, पण त्यात सातत्य हवे. एका बाजूला गुन्हेगारांवर कडक कारवाई आणि दुसरीकडे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आपुलकीने आणि त्याच्यावरच उपकार करतोय, अशी भावना न ठेवता सोडवणूक करणे या दोन्ही बाजू पोलिसांना सांभाळाव्या लागतील.
पुणे पोलिस 'इन ऍक्शन'; गजा मारणेसह सराईत गुंड झाले फरार!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवा असे सुनावले खरे; पण, गुंड गजा मारणे याने मिरवणुकीसाठी वापरलेली आलिशान गाडी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची होती. त्याच्यावर काय कारवाई करणार, हेही सांगायला हवे. वाढदिवसानिमित्त तलवारीने रस्त्यात उभे राहून केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी, रात्री वाहनांची जाळपोळ-मोडतोड हे प्रकार वेळीच थांबायला हवेत. महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे, अशावेळी या गुंडांना दूर ठेवण्याचे धैर्य जरी राजकीय पक्षांनी दाखवले, तरी अशा प्रकारांना आळा बसू शकेल. चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठबळ दिल्यास पुणे परिसरात वाढणारी गुंडगिरी मोडून काढण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी पोलिस निश्चित तयारीला लागतील अशी अपेक्षा आहे.
Edited By - Prashant Patil