भाजपला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न

पुण्यात शंभर जागांपर्यंत उधळलेला भारतीय जनता पक्षाचा वारू अडविण्यासाठी प्रभागरचनेत मोठे फेरबदल करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
BJP and Mahavikasaghadi
BJP and MahavikasaghadiSakal
Summary

पुण्यात शंभर जागांपर्यंत उधळलेला भारतीय जनता पक्षाचा वारू अडविण्यासाठी प्रभागरचनेत मोठे फेरबदल करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.

पुण्यात शंभर जागांपर्यंत उधळलेला भारतीय जनता पक्षाचा वारू अडविण्यासाठी प्रभागरचनेत मोठे फेरबदल करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. प्रभागरचनेवरुन भाजपची मोठ्या प्रमाणावर कोंडी केल्याचे चित्र सध्यातरी दिसते. त्यामुळे महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होणार हे मात्र नक्की.

‘तळे राखील, तो पाणी चाखील’ या उक्तीप्रमाणे राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेत नेहमीच आपल्या सोयीनुसार बदल केले आहेत. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. पुणे महापालिकेची प्रभागरचना करताना अशाच पद्धतीचे फेरबदल झाल्याचे प्रारूप प्रभागरचनेवरुन स्पष्ट होते. पुण्यात ५८ प्रभागांची रचना मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. या ५८ प्रभागांतून १७३ नगरसेवक महापालिकेत प्रतिनिधित्व करणार आहेत. या प्रस्तावित प्रभागरचनेत अपेक्षेप्रमाणे मोठे फेरबदल झाले आहेत. नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे या प्रभागरचनेत आली आहेत. त्यामुळे प्रभागरचनेत नैसर्गिक बदल होतील असे अपेक्षित होते, पण तेवढ्यावर न थांबता प्रभागरचनेत राजकीय बदलही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसतात.

पुण्यात २०१७ च्या निवडणुकीत भाजपने प्रथमच शंभर जागांपर्यंत मजल मारत एकहाती सत्ता मिळवली. या सत्तेत शिवाजीनगर, कोथरूड, कसबा पेठ, पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांचा मोठा वाटा होता. नेमकी हीच बाब ओळखून नव्या रचनेत मोठी मोडतोड झाली आहे. कोथरूड मतदारसंघात महापौर मुरलीधर मोहोळ यांचा बावधन खुर्द-महात्मा सोसायटी हा प्रभाग क्रमांक ३३ किमया हॉटेल ते भूगाव असा ३० चौरस किलोमीटरपर्यंत पसरला आहे. त्यामुळे भाजपला येथे कसरत करावी लागणार आहे. माजी उपमहापौर दीपक मानकर यांना जय भवानीनगर-केळेवाडी हा सोयीचा प्रभाग बनला आहे. थोडक्यात, भाजपला प्रत्येक मतदारसंघात संघर्ष करावा लागणार आहे.

BJP and Mahavikasaghadi
पुणे महापालिका निवडणुकीत आरक्षणाची टांगती तलवार

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात शनिवार पेठ-राजेंद्रनगर, शनिवारवाडा-कसबा पेठ असे अनेक बदल केले आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान सदस्य असणारे प्रभाग नैसर्गिक हद्दींचे बंधन न पाळता तोडल्याचे स्पष्ट होते. हडपसर विधानसभा मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेने केला होता. हीच वेळ या प्रभागरचनेत भाजपवर आल्याचे दिसते. भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या जुन्या प्रभागाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (प्रभाग ४७) कोंढवा खुर्द-मिठानगर, सय्यदनगर-लुल्लानगर, वानवडी-कौसरबाग, काळेपडळ-ससाणेनगर, नव्याने समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि परिसरातील गावे या प्रभागांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, भाजपला या ठिकाणी मोठी कसरत करावी लागेल असे सध्या तरी चित्र दिसते.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा समावेश असणारे चार प्रभाग तयार झाले आहेत. तेवीस गावांचा समावेश असलेल्या प्रभागांचे क्षेत्रफळही मोठे आहे. या भागातही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार असून, भाजपच्या ताब्यात असणारे प्रभागांत मोठ्या बदल करण्यात आले आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव असणाऱ्या सिंहगड रस्ता परिसरातील प्रभाग मोठ्या प्रमाणावर बदलण्यात आल्याचे दिसते. या ठिकाणीही भाजपच्या विद्यमान नगरसेवकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणावर मोडतोड करून भाजपला रोखण्याचा पहिला प्रयत्न दिसतो. भाजपचे विद्यमान १०० नगरसेवक असल्याने, आता नव्या रचनेत त्या सर्वांना सामावून घेणे हे पक्षासमोरील आव्हान असणार आहे. प्रभागरचना विशिष्ट नगरसेवकांसाठी सोयीची झाली, असे वाटत असले तरी महाविकास आघाडी झाली तर काय होणार यावरही अनेक गणिते अवलंबून राहणार आहेत. केवळ प्रभागरचनेवरून अनेक विद्यमान सदस्यांना प्रभाग बदलावा लागणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यातही अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण कसे पडणार यावर सर्व चित्र अवलंबून राहणार आहे. महिलांसाठी ८७ जागांवर आरक्षण राहणार आहे. तर एकूण जागांपैकी २३ जागांवर अनुसूचित जाती आणि दोन जागांवर अनुसूचित जमातीचे आरक्षण राहणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, जर ओबीसी आरक्षण राहिले तर सुमारे ४७ जागा त्यांच्यासाठी राखीव असतील. त्यामुळे प्रभागरचना झाली तरीही आरक्षणे कशी पडतात यावर पुढचे राजकीय चित्र अवलंबून असेल.

BJP and Mahavikasaghadi
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत ठरले काही महत्त्वाचे निर्णय

या प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना घेण्याची तरतूद असली तरीही आतापर्यंतचा अनुभव पाहता हरकती-सूचनांमधून दहा टक्क्यांहून अधिक बदल झालेले दिसत नाहीत. त्यामुळे सध्याच्या प्रभागरचनेचे चित्र डोळ्यांसमोर ठेवूनच पुण्यात लढती होणार आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे ६५ ते ७० हजार मतदार असतील त्यामुळे प्रभागांमध्ये मोडतोड झाली तरी एकूण मतदारांवर कोण प्रभाव टाकणार हेच निवडणुकीच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, प्रभागरचनेची पहिली लढाई ही भाजपसमोर अडथळे निर्माण करणारी ठरली आहे, हे नक्की.

दृष्टिक्षेपात प्रभाग रचना...

  • प्रभागरचना बदलांचा २०१७ चा वचपा २०२२ मध्ये काढला.

  • भाजपचा प्रभाव असणाऱ्या सर्वच प्रभागांत मोठे बदल

  • नव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये मोठे प्रभाग

  • प्रभाग रचनेवर महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व

असा पाहा तुमचा प्रभाग....

  • https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर जा

  • तेथील होमपेजवरच ‘प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा’ येथे क्लिक करा असा पर्याय आहे

  • क्लिक केल्यानंतर प्रभागांच्या नावाची यादी समोर दिसेल

  • तुम्ही राहात असलेल्या परिसरातील प्रभागावर क्लिक करा

  • त्यानंतर नवीन विंडो खुली होईल

  • त्या विंडोवर तुम्हाला प्रभागाचा पीडीएफ नकाशा मिळेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com