गरज मुलांच्या मानसिकतेवर काम करण्याची

कबड्डीपटू असलेल्या क्षितिजाला अजून प्रेमाची व्याख्याही नीट माहिती नसेल, पण तिच्यावर दोन वर्षांपासून प्रेम करीत असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने अत्यंत निर्घृणपणे साथीदारांच्या मदतीने खून केला.
Mindset
MindsetSakal

पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना बिबवेवाडी भागात तेरा वर्षांच्या मुलीचा अत्यंत नियोजनपूर्वक खून केला जातो, ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. पण त्याही पेक्षा अशा घटना रोखण्यासाठी मुळापासून प्रयत्न करण्याऐवजी ज्या मुर्दाड आणि संवेदनाहीन पद्धतीने अशा घटनांकडे पाहिले जाते, ते अधिक धोकादायक आणि समाजाचा स्तर आणखी खालावण्यास जबाबदार ठरणारे आहे.

कबड्डीपटू असलेल्या क्षितिजाला अजून प्रेमाची व्याख्याही नीट माहिती नसेल, पण तिच्यावर दोन वर्षांपासून प्रेम करीत असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने अत्यंत निर्घृणपणे साथीदारांच्या मदतीने खून केला. अशा प्रसंगी केवळ पोलिसांचा धाक, कायद्याचा वचक या गोष्टींवर बोलून भागणार नाही. अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण आणि प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे प्रमाण रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न कुटुंब, शाळा आणि समाज अशा पातळीवर झाले तर त्याचा निश्चित आणि दीर्घकाळ परिणाम होईल. पण प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची सवय लागलेले राज्यकर्ते आणि नेत्यांना आधी प्रशिक्षित करावे लागेल. महिला आयोगाचे अध्यक्षपदावरून ज्या पद्धतीने महिला नेत्या बोलत आहेत, ते पाहिले की यांच्याकडून काय अपेक्षा करावी असा प्रश्न पडतो.

अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुला-मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी लैंगिकता शिक्षण हा मार्ग तज्ज्ञ वारंवार सुचवतात. मात्र अशा शिक्षणासंदर्भात कोणत्याच पातळीवर स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे लैंगिक शिक्षणाबाबत केवळ चर्चा होते, शालेय पातळीवर एखादा प्रयोग नावापुरता राबवला जातो, पण त्यातून खऱ्या अर्थाने हे शिक्षण होत नाही. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

Mindset
ट्रॅक्टर चालवून हर्षवर्धन पाटील यांनी जिंकली शेतकऱ्यांची मने

किशोरवयीन काळात लैंगिक आकर्षण, भावना योग्य पद्धतीने कशा हाताळाव्या हे कळत नसल्याने बलात्कार किंवा खुनासारख्या टोकाच्या घटना वारंवार घडत आहेत. लैंगिक भावनांचे व्यवस्थापन कसे करायचे याचे कमी वयापासून शिक्षण मिळाले तर अशा हिंसक गोष्टी आणि मुलांचे मानसिक आरोग्यही चांगले राखणे शक्य होणार आहे. त्यासाठी कुटुंबात आई-वडिलांनीही प्रशिक्षित होणे आवश्यक आहे. घरातील आई-बहिणीचा आदर करण्याची शिकवण घरातून मिळाली तर हे संस्कार समाजात वावरतानाही उपयोगी पडतील. एकच पाल्य, आई वडिलांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसणे, गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण अशा अनेक कारणांनी मुलं हट्टी होत आहेत. मला हवी असलेली गोष्ट हवीच असा त्यांचा अट्टहास असतो, त्यातून कोणताही नकार पचवता येणे त्यांना अवघड जाते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले, तर मुलांमधील टोकाची भूमिका घेण्याची प्रवृत्ती नक्की कमी होऊ शकते. पण त्यासाठी आवश्यक असणारी सिस्टीम तयार करावी लागेल.

किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य, लैंगिकता शिक्षण-व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांवर काम करणारी शासकीय यंत्रणाच अत्यंत तोकडी आणि निर्जीव आहे. पुण्यात या क्षेत्रात दोन-चार स्वयंसेवी संस्था वगळता शासकीय किंवा महापालिका पातळीवर कोणतेही काम होताना दिसत नाही. केंद्र सरकारने ७ जानेवारी २०१४ मध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (आरकेएसके) जाहीर केला. यात किशोरवयीन आरोग्य केंद्रापासून अनेक चांगल्या योजनांची घोषणाही झाली. मात्र गेल्या सात वर्षांमध्ये या योजनांची साधी कल्पनाही कोणाला नसल्याचे जाणवते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर किशोरवयीन मुलांच्या प्रशिक्षणासाठी ठोस धोरण यंत्रणा तयार करण्याची गरज आहे.

Mindset
एकटे नाही तर पॅनेल निवडून आणायचा विचार करा; चंद्रकांत पाटील

पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी कायद्याच्या, बंदोबस्ताच्या बाजूने प्रयत्न करायलाच हवा. याशिवाय त्यांच्या पातळीवर मुलांमध्ये संवाद वाढविण्यासाठी कार्यक्रम आखायला हवेत. पुणे हे सुरक्षित शहर आहे. त्याचे मानसिक आरोग्य, सुरक्षा चांगली ठेवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा अशा घटना रोखणे कठीण होईल.

हे तातडीने करा...

किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारणे.

शाळा, वस्त्यांमध्ये मुलांच्या प्रशिक्षणासाठी व्यवस्था

छेडछाड किंवा इतर तक्रारींची गंभीर दखल घेऊन वेळीच कारवाई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com