वानखेडेंची इमेज सिंघम अशी बनवली गेली, पण...; मलिकांचे अनेक खुलासे

मलिकांनी समीर वानखेडे प्रकरण गांभीर्यानं का घेतलं? सध्या ते का शांत आहेत?; जाणून घ्या...
nawab malik, Sameer Wankhede
nawab malik, Sameer Wankhedeesakal

पुणे : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज केसमधील अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. याचं कारण काय होतं याचा खुलासा स्वतः मलिक यांनी सकाळ डिजिटलशी बोलताना केला आहे. हे सांगताना समीर वानखेडेंची इमेज सिंघम अशी बनवली गेली, पण आता हा फुगा फुटलाय, असंही ते म्हणाले.

मलिक म्हणाले, "माझे जावई समीर खान यांना १३ जानेवारी रोजी ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. त्याचदिवशी मी ट्विट केलं होतं की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा आपलं काम करेन या देशातील न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. अटकेनंतर मी काहीही बोललो नाही किंवा कुठलाही खुलासा केला नाही. पण आठ महिन्यानंतर माझ्या जावयाला जामीन मिळाला. जामीन मंजूर झाला त्यावेळी एनडीपीएस कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं होतं की, चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरुन ही केस खोटी असल्याचं स्पष्ट होतं."

समीर खान प्रकरणाची काय होती पार्श्वभूमी?

सुरुवातीला एनसीबीनं बॉलिवूडच्या लोकांवर कारवाया केल्या. त्यांना समन्स बजावलं जात होतं संपूर्ण मीडियामध्ये याच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी काही वर्तमानपत्रांमध्ये माझी प्रतिक्रिया छापून आली होती. त्यावेळी माझं स्पष्ट म्हणणं होतं की, जर एखादा व्यक्ती ड्रग्ज अॅडिक्ट असेल तर त्याच्यासाठी वेगळे कायदे आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी रिहॅबिलिटेशन अर्थात पुनर्वसन केंद्रात पाठवायला हवं. पण तुम्ही या कारवायांमधून जी पब्लिसिटी करत आहात ती योग्य नाही. माझ्या या प्रतिक्रियेनंतर काही पत्रकार माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की, वानखेडे नावाचे अधिकारी तुमच्यावर नाराज आहेत. त्यावर मी त्यांना सांगितलं की, मी माझं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा असं त्यांना सांगा. दरम्यान, एका पत्रकाराचा मला फोन आला आणि त्यानं मला विचारलं की, एनसीबीनं तुमच्या जावयाला समन्स पाठवलंय का? त्यावर मला माहिती नसल्याचं मी त्याला कळवलं. यानंतर संध्याकाळी अशी बातमी आली की, माझ्या जावयाला '२७ अ' कलमाखाली अटक झाली. त्यानंतर ट्विट करुन मी याची माहिती दिली होती. त्यानंतर जोपर्यंत त्यांना जामीन झाला नाही तोपर्यंत मी एकही शब्द एनसीबीच्या विरोधात बोललो नाही, असं मलिक यांनी सांगितलं.

समीर खान यांच्या अटकेनंतर काय घडलं?

"मधल्या काळात काय घडलं ते मी आज सांगतो, माझ्या मुलीला याचा मोठा धक्का बसला त्यावेळी तीनं खिडकीच्या काचेला लाथ मारली त्यात ती जखमी झाली त्यामुळं रात्रभर आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. त्यानंतर सकाळी माझ्या जावयाच्या घरावर रेड पडली आणि सर्व बातम्या सुरु झाल्या. यावेळी त्यांच्या घरात काही मिळाल्याचं सांगितलं गेलं. पण पंचन्याम्यात त्यांच्या घरातून काहीच मिळालं नव्हतं. सेंट नावाचा एक तंबाखूचा ब्रँड होता त्याला त्यांनी ड्रग म्हणून सांगितलं आणि २०० किलो गांजा दाखवून केस केली. या प्रॉडक्टची आम्ही माहिती घेतली तर ते ऑनलाईन सर्व ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होतं. या पदार्थाची आम्ही ड्रग कीटमार्फत तपासणी केली. त्यात हे स्पष्ट झालं की ही तंबाखू आहे. त्यानंतर आम्ही माहिती अधिकाराच्या माध्यमातून गुजरातची जी फॉरेन्सिक लॅब आहे, तिथून रिपोर्ट आला की नाही हे तपासलं. दरम्यान, एक बातमी आली की, दिया मिर्झाच्या पीएला अटक झाली त्याचा नवाब मलिकच्या जावयाशी संबंध असल्याचं दाखवलं गेलं. पण यामध्ये प्रत्यक्ष गुन्हा नाही तर पब्लिसिटीचा प्रकार असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळं एनडीपीएस कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो. त्यानंतर एनसीबीनं सांगितलं की, आम्ही एका आठवड्यात चार्जशीट फाईल करतो. माझा मुलगा वकील आहे त्यानं अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की, सीएच्या रिपोर्टमध्ये कुठलंही ड्रग नाही. त्यानंतर जामीन अर्ज दाखल झाला पण त्यातही अडीज महिने टाळाटाळ झाली. दरम्यान, एनसीबीनं मधल्या काळात विविध ठिकाणी रेड केल्या त्यातील पुरावे हे एकाच टेबलवरावर ठेवून फोटो काढून मीडियामध्ये क्राईम रिपोर्टर्सना पाठवले गेल्याचं उघड झालं. यावरुन आमच्या लक्षात आलं की हे कुठेतरी फेक केस टाकत आहेत"

"समीर वानखेडेंची इमेज सिंघम अशी बनवली गेली"

यानंतर मी सगळा अभ्यास सुरु केला. पण भाजपनं माझ्यावर आरोप केला की, माझ्या जावयावर कारवाई झाल्यानं मी हे सर्व करतो आहे. आर्यन खान प्रकरणानंतर तर समीर वानखेडे यांची इमेज अशी करुन ठेवली होती की, हा सिंघम आहे. म्हणजो तो कोणाला सोडत नाही. खरी परिस्थिती अशी होती की पल्बिसीटीसाठी हा अधिकारी वेगळ्या पद्धतीनं काम करायचा. नामवंत लोकांकडून पैसे वसूल करायचा. पण कुठल्याही ड्रग्ज पेडलरला त्यानं कधी पकडलं नाही हे धंदे सुरुच होते. हा सगळा अन्याय होत होता. त्यामुळं जर यावेळी कधी कोणी आवाज उठवलाच नसता तर वानखेडे कशी व्यक्ती आहे, हे कोणालाच कळलं नसतं. मी एका ट्विटमध्ये दुबई आणि मालदीवमध्ये वसूली झाल्याचं म्हटलं होतं. कारण या दोन्ही ठिकाणचे फोटो समीर वानखेडे यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटर नाही तर त्यांच्या पत्नी आणि बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटर होते. यामध्ये वानखेडे दिसत आहेत. हे फोटो कुठून अपलोड झाले हे देखील आम्ही एका अॅपमार्फत क्रॉसचेक केलं. मालदीवला जेव्हा केसेसमध्ये तोडपाणी झाली. त्यासाठी ताज हॉटेलला राहिल्याचं आणि विमानाच्या तिकीटांपोटी बारा हजार डॉलरचं पेमेंट जे सूट देऊन सहा हजार डॉलर कॅशमध्ये झालं. हे पेमेंट फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित एका टॉप व्यक्तीकडून झालं आहे. ज्याचे संबंध सर्व मोठ्या स्टार्सशी आहे, आज आणि उद्या हे समोर येईलच, असंही मलिक यावेळी म्हणाले.

वानखेडेप्रकरणी मलिक आत्ता गप्प का?

वानखेडे प्रकरणी सतत्यानं आरोप केल्यानंतर नवाब मलिक आता शांत का आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना मलिक म्हणाले, "कोर्टानं याप्रकरणी आम्हाला सूचना केली की, जोपर्यंत ही केस कोर्टात आहे तोपर्यंत याबाबत काहीही बोलायचं नाही. त्यामुळं मी सध्या शांत आहे. आज मी जे बोलतो आहे ते मागच्या संदर्भात बोलतो आहे. नव्यानं मी काही आरोप केलेले नाहीत. यामध्ये मला शरद पवार यांनी कधीही गप्प बसा असं सांगितलं नाही उलट माझी पाठराखणंच केली."

"माझी एकट्याची लढाई असल्याचं भाजपनं रंगवलं"

दरम्यान, भाजपनं रंगवलं की, ही माझी एकट्याची लढाई आहे. पण अन्यायाविरोधात मी लढत होतो. मी सरकारमध्ये असलो तरी सरकार अशा वेळी असं कधीही म्हणणार नाही की, तुम्ही लढू नका. त्यामुळं मी बोलत होतो तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील सर्वजण शांत होते, असा खुलासाही यावेळी मलिक यांनी केला.

आर्यन खान मुस्लिम आहे म्हणून मी लढलो नाही - मलिक

सुरुवातीला सर्वजण हे बोलत होते की, आर्यन खान मुस्लिम आहे म्हणून मी वानखेडेंवर आरोप करतोय. पण हे तसं नाही. कारण वानखेडे देखील मुस्लीमच निघालेत. त्यामुळं आता त्या आरोपांना अर्थच राहिलेला नाही. पण आर्यन खान ही हायप्रोफाईल केस होती म्हणून त्याकाळात या बातम्यांनी वेग घेतला होता. शाहरुख खानशी मी कधीही समोरा समोर बोललो नाही किंवा त्याच्याशी फोनवरही बोलणं झालं नाही, असंही मलिकांनी यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com