सपाटीकरणाला लगाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranade Institute

सपाटीकरणाला लगाम

पत्रकारितेचे सहा दशकांहून अधिक काळ शिक्षण देणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग रानडे इन्स्टिट्यूटमधून स्थलांतरित करण्याचा आणि या विभागाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय विद्यापीठाने शनिवारी अखेर रद्द केला. फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटमधून या विभागाचे विद्यापीठाच्या आवारात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. शिवाय, या विभागाचे मीडिया आणि कम्युनिकेशन विभागात विलीनीकरण करण्याचाही प्रस्ताव होता. हे दोन्ही प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने रद्द केले. स्थलांतर आणि विलिनीकरणाच्या प्रस्तावाला पत्रकारितेच्या आजी-माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी आणि पत्रकारितेतर घटकांनी कडाडून विरोध केला. या विरोधापुढे अखेर विद्यापीठ प्रशासनाने माघार घेतली.

या एकूण प्रकाराने काही मूलभूत प्रश्नांना हात घातला. हे प्रश्न पत्रकारिता, कम्युनिकेशन, सोशल मीडिया, माध्यम व्यवसाय, आंतरविद्या शाखीय शिक्षण (इंटर डिसिप्लिनरी) आणि सातत्याने सुरू असलेल्या बदलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांच्याशी संबंधित आहेत. पत्रकारिता (जर्नालिझम) आणि संज्ञापन (कम्युनिकेशन) या दोन्हींचा अर्थ एकच आहे, असे सातत्याने सांगितले आणि शिकवले गेले. विशेषतः गेल्या दोन दशकांमध्ये पत्रकारिता शिकणे म्हणजे कम्युनिकेशन शिकणे असे ठरवत नेले गेले. इंटरनेट आणि त्यावर आधारित डिजिटल माध्यमांचा उदय आणि विकास झाला, तसे पत्रकारिता आणि कम्युनिकेशन यांच्यातील सीमारेषा धूसर बनली. गेल्या दशकभरात आंतरविद्या आणि बहुविद्या शाखीय शिक्षणाचा प्रसार झाला, तसा पत्रकारिता म्हणजेच कम्युनिकेशन, यावर भारतातील जवळपास सर्वच विद्यापीठांनी शिक्कामोर्तब केले.

या साऱ्या प्रक्रियेला रानडे इन्स्टिट्यूट प्रकरणाने छेद दिला. आंतरविद्या आणि बहुविद्या शाखीय शिक्षण आवश्यक आहेच; मात्र या शिक्षणाचा अर्थ सर्वच विद्या शाखांमध्ये पारंगत होणे, असा नाही. मुख्य विद्याशाखेतील ज्ञानाला पूरक असा अन्य विद्याशाखांचा समावेश, असा याचा अर्थ आहे. उदा. भौतिकशास्त्रात काम करू इच्छिणाऱ्याला गणिताचे आवश्यक ते आकलन व्हावे, यासाठी भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये इंटर डिसिप्लनरी शिक्षण हवे. याचा अर्थ भौतिकशास्त्र हा गणिताचाच भाग आहे, असा नाही.

पत्रकारिता शिक्षणाच्या बाबतीत आंतरविद्या आणि बहुविद्या शाखा प्रवास फार झपाट्याने कम्युनिकेशनकडे सरकवला गेला. पत्रकारिता करण्यासाठी कम्युनिकेशन समजले पाहिजे, हे मान्य आहे. प्रिंट-ऑडियो-व्हिज्युअलमधून नेमके कम्युनिकेशन साधता आले, तर पत्रकारिता उत्तम करता येते, याबद्दल शंका नाही. मात्र, म्हणून पत्रकारिता हा कम्युनिकेशनचाच एक भाग आहे, असे ठरवून टाकले गेले आहे. वस्तुतः या दोन्ही परस्परपूरक ज्ञानशाखा असल्या, तरी त्या स्वतंत्र आहेत. कम्युनिकेशनमध्ये मार्केटिंग, विकासात्मक (डेव्हलपमेंट), कॉर्पोरेट आदी प्रकार आहेत. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात पत्रकारिता आहे. पत्रकारिता शिकण्यासाठी मार्केटिंग, विकासात्मक, कॉर्पोरेट कम्युनिकेशन यायला कोणाचीच हरकत नाही; मात्र मार्केटिंग, विकासात्मक, कॉर्पोरेट असे कम्युनिकेशनचे प्रकार आले म्हणजे पत्रकारिता झाली, असे होऊ शकत नाही.

रानडे इन्स्टिट्यूटच्या वादाने या विषयावर पहिल्यांदाच चर्चा झाली. कदाचित येत्या काळात आंतरविद्या-बहुविद्या शिक्षण पद्धतीत नेमके कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यायचे आहे, या गोंधळात अडकण्यापासून विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुटका या चर्चेतून होऊ शकते. पत्रकारिता विभाग विलीन करण्याचा निर्णय रद्द करून, विद्यापीठाने गोंधळ दूर करणारे एक पाऊल सक्तीने का होईना टाकले. ते पाऊल महाराष्ट्रातील आणि पर्यायाने देशातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे आहे. आंतरविद्या-बहुविद्या शिक्षण पद्धत म्हणजे दोन-चार विभाग एकमेकांत विलीन करणे, इतके बावळट सुलभीकरण करू पाहणाऱ्यांना रानडे इन्स्टिट्यूटबद्दलच्या निर्णयाने लगाम बसला आहे. आधुनिक शिक्षण प्रणालीच्या नावाखाली अशा प्रकारे विलीनीकरण करून शिक्षणाचेच सपाटीकरण होण्याचा धोका आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या प्रकरणातून धडा घेऊन, अशा विलीनीकरणापूर्वी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था किमान सारासार विचार करतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Samrat Phadnis Writes About Ranade Institute Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top