आता मुलांना घडवायचंय...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Dhotre
आता मुलांना घडवायचंय...!

आता मुलांना घडवायचंय...!

किरकटवाडी - ‘मी तिसरी शिकलोय. जगाया पुरतं लिहिता वाचता येतंय. ‘ती’ तर शाळंतच गेली नाय; पण आमचा संसार चांगला सुरू हाय. पिढ्यानपिढ्या चालत आल्याला आमचा हा दगडं घडवायचा धंदा करतोत. आता काळ बदललाय दादा. पहिल्यासाखी मागणी ऱ्हायली नाय. खेड्यातली लोकं गरज म्हणून आणि शहरातली लोकं हौस म्हणून आमी बनिवल्याल्या वस्तू घेत्यात. लय कष्ट हाय. आता लेकरांच्या हाती हातोडा बघितला की डोळ्यात पाणी येतं बघा. आमी ठरवलंय, पोरांना असला धंदा करू द्यायचा नाय. ह्यो मोठा पाचवीत हाय अन् बारक्याला अजून शाळंत घालायचाय. लागण तेवढं कष्ट करणार; पण पोरांना शिकवून मोठं करणार!’’

जातं बनविण्यात मग्न असणारा संजय अगदी ओघवतं मनातलं बोलत होता. मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागापूर या गावचा रहिवासी असलेला बत्तीस वर्षीय संजय लक्ष्मण धोत्रे हा त्याची पत्नी सुमन व मुले सचिन (वय १०) आणि राजेश (वय ५) यांच्यासह सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत मुख्य रस्त्याला लागून पाटा-वरवंटा, जातं, ऊखळ, दगडी खलबत्ता, दगडी दिवा अशा वस्तू विकायला आलेला आहे. तेथेच रस्त्याच्या कडेला त्याने उघड्यावर महिनाभरासाठी आपला तात्पुरता संसार थाटला आहे. दिवसभर हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन दोघे पती-पत्नी दगडी वस्तू बनवण्यात व्यस्त असतात.

आपल्या व्यवसायाबद्दल सांगताना संजय म्हणतो की, दोन तीन दिवस एक जातं किंवा पाटा-वरवंटा बनवायला लागतात. जातं हजार ते बाराशे रुपये, पाटा-वरवंटा सहाशे रुपये, ऊखळ सहाशे ते सातशे रुपये, खलबत्ता तीनशे रुपये आणि आकारानुसार शंभर ते दीडशे रुपयांना दिवा विकतो. वर्षाकाठी घरखर्च भागवून पन्नास-साठ हजार रुपये शिल्लक राहतात. हळूहळू या पारंपरिक वस्तूंची मागणी कमी होत चालली आहे, त्यामुळे आमच्या मुलांना हा व्यवसाय करू देणार नाही. त्यासाठी त्यांना चांगलं शिकवणार आहे. आमच्या कित्येक पिढ्यांनी दगड घडवला आहे; पण आम्ही आता मुलांना घडवणार आहोत.

Web Title: Sanjay Dhotre Talking On His Life Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top