संजय, तू भाजपला हल्ली चांगले सल्ले देतोस : शरद पवार

अन्वर मोमीन
सोमवार, 24 डिसेंबर 2018

भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांच्या संभाषणात नेमके काय घडले, याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त होत होते. काकडे हे हातावर घड्याळ किंवा हातच हातात घेण्याची चर्चा होती. त्यावर पवार यांनीच काकडे यांना गुगली टाकल्याचे या दोघांच्या संभाषणातून कळते. हे संभाषणातील वाक्य काकडे यांनीच सांगितले. वडगाव शेरीत नगर रोड कट्ट्यावर पत्रकारांसमोर याचा खुलासा झाला.

पुणे : भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांच्या संभाषणात नेमके काय घडले, याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त होत होते. काकडे हे हातावर घड्याळ किंवा हातच हातात घेण्याची चर्चा होती. त्यावर पवार यांनीच काकडे यांना गुगली टाकल्याचे या दोघांच्या संभाषणातून कळते. हे संभाषणातील वाक्य काकडे यांनीच सांगितले. वडगाव शेरीत नगर रोड कट्ट्यावर पत्रकारांसमोर याचा खुलासा झाला.

काकडे यांचे निवडणुकीच्या निकालाविषयीचे अंदाज खरे ठरतात, असे राजकीय नेत्यांनाही पटू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यावर काकडे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला सल्ला दिला होता. यापुढे, भाजपला जिंकायचे असेल तर भाजपने आता हनुमानाची जात, शहरांचे नामकरण, राममंदिर यावर राजकारण न करता विकासावर बोलावे असे त्यात काकडे यांनी सांगितले होते. जुमलेबाजी करून पुढील निवडणुका जिंकता येणार नाही, असे मतही त्यांनी या सल्ल्यात मांडले होते.

योगायोगाने काकडे यांचे हे मत पवार यांनी टिव्हीवर पाहिले. काकडे त्यांना भेटायला गेल्यानंतर पवार यांनी हल्ली तू चांगले सल्ले देतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे काकडे आता आपले सल्ल्यांचे प्रमाण वाढवणार का आणि भाजप त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार का, हे पाहायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay you are giving good advice to bjp Says Sharad pawar