माऊलींच्या पादुका अलंकापुरीत दाखल

माऊलींच्या पादुका अलंकापुरीत दाखल

आळंदी (पुणे) : गुलछडी आणि ऑर्केड फुलांनी सजवलेली बस...पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात वाटचाल...गावोगावी रांगोळ्याच्या पायघड्या...बसवल होणारी फुलांची मुक्त उधळण...माऊली माऊलीचा जयघोष...अशा वातावरणात हजारो भाविकांनी पंढरीत आपली वारी रूजू करून अलंकापुरीकडे निघालेल्या माऊलींच्या भक्तिमार्गावर हजारो भाविकांनी आपली श्रद्धा माऊलींच्या चरणी समर्पित केली. तसेच, मनोमन माऊलींना कोरोनामुक्तीचे साकडे घातले. तुकोबारायांसह सर्वच संतांच्या मार्गावर असेच चित्र होते.

आषाढी पायी वारी रद्द झाल्याने सरकारने सर्व संतांना आषाढी वारी त्यांच्या नियोजनाने घडविली. मात्र, पंढरपूरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता पंचमीऐवजी द्वादशीला म्हणजे गुरुवारी (ता. 3) परत आपापल्या तीर्थक्षेत्री जाण्यास सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसहापासून दुपारी बारापर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व संतांच्या पादुकांना विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. त्यानंतर द्वादशीचे पारणे फेडून सर्व संतांच्या पादुका आपापल्या स्वगृही परतल्या. दरम्यान, तुकोबारायांच्या पादुका दुपारी दोन वाजता, तर माऊलींच्या पादुका तीनच्या सुमारास परतीच्या प्रवाशासाठी मार्गस्थ झाला. आकर्षक फुलांनी सजविलेल्या बसमध्ये मालक राजाभाऊ आरफळकर यांनी पादुका बसमध्ये विराजमान केल्या. बसमध्ये प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे, योगेश देसाई, बाळासाहेब चोपदार तसेच परवानगी मिळालेले वारकरी होते. माऊली-माऊली नामाचा जयघोष करून पंढरपूरकरांनी माऊलींना निरोप दिला. 

यंदा पायी सोहळा नाही आणि पादुकांना लवकर परतावे लागत असल्याने पंढरपूरकरांच्या कडा पानावल्या. वाटचालीत गावोगावी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. भाविक बसमधून जाणाऱ्या भाविकांची वाट पाहत थांबून होते. ठिकठिकाणी माऊली नामाचा जयघोष करीत हात जोडत होते. तर कोणी रस्त्यावर डोके टेकवून नतमस्तक होत होते. भाविक असो वा पोलिस सारेच नतमस्तक होत होते. यंदाच्या वारीत लालपरी भाव खाऊन गेली. तिच्यात माऊली विराजमान असल्याने भाविक मोबाईलमध्ये तिची छबी टिपताना दिसत होते. जेजुरी येथे बसवर भंडाऱयाची उधळण करण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास बस आऴंदीजवऴील थोरल्या पादुका मंदिरात आरतीसाठी थांबली. आळंदीकरांनी रांगोळ्याच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी करीत पंरपरेप्रमाणे मंदिरातील कारंजे मंडपात ठेवण्यात आली आहे. 15 जुलै रोजी पादुका मंदिर प्रदक्षिणा करून समाधी मंदिरात नेण्यात येणार आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com