
सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अश्वरिंगण उत्साहात
सोमेश्वरनगर - 'ग्यानबा तुकाराम' चा टीपेला पोचलेला गजर आणि त्याला मिळालेली टाळ मृदुंगाची साथ, अशा वातावरणात संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अश्वरिंगण आज सोमेश्वरनगरला पार पडले. वारकऱ्यांच्या मानवी रिंगणातून सोपानकाकांच्या पालखी पाठोपाठ मानाच्या अश्वांनीही तीन फेऱ्या मारल्या आणि भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
आज निंबुतचा मुक्काम संपवून आलेल्या पालखी सोहळ्याचे निंबुत छप्री ग्रामस्थांनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात स्वागत केले. स्वागतप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, संचालक लक्ष्मण गोफणे, उपसरपंच अमर काकडे, शिवाजी लकडे आदी उपस्थित होते. यानंतर वाघळवाडी येथे अंबामाता मंदिरात दुपारी पालखी सोहळा भोजनासाठी पोचला. सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सतीश सकुंडे, अजिंक्य सावंत, अॅड. हेमंत गायकवाड, गणेश जाधव, नरसिंह राठोड आदी उपस्थित होते. वाघळवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तसेच हरणाई माता मंडळाच्या वतीने पिठलं भाकरीचे भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने आरोग्यतपासणी व अल्पोपाहाराची सोय केली होती.
दरम्यान दुपारी तीन वाजता पालखी सोहळा येथील काकडे महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर जमला. तहसीलदार विजय पाटील, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सोमेश्वरचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक शैलेश रासकर, संग्राम सोरटे, अनंत तांबे उपस्थित होते. हजारो वारकऱ्यांनी गोल मानवी रिंगण तयार केले. रिंगणाच्या दुतर्फा टाळकऱ्यांनी ठेका धरला होता.
ग्यानबा तुकारामच्या जयघोषात मृदुंगाचा नाद आसमंतात घुमत होता. सुरवातीस टाळकरी, विणेकरी, तुळस डोईवर घेतलेल्या महिलांनी रिंगणातून धाव घेतली. यानंतर मानकरी, भालदार, चोपदार पालखी घेऊन धावले. शेवटी दोन अश्वांनी रिंगणात तीन फेऱ्या मारल्या. पंचक्रोशीतून असंख्य नागरिक रिंगण पाहण्यासाठी उपस्थित होते. पालखीप्रमुख व पोलिसांच्या सहयोगाने रिंगण अत्यंत शिस्तीत पार पडले.
सायंकाळी पाच वाजता सोमेश्वर कारखाना येथे पालखी सोहळा मुक्कामासाठी पोचला. सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक ऋषी गायकवाड, किसन तांबे, सचिव कालिदास निकम यांनी स्वागत केले. संचालक लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते पादुकांना अभिषेक करण्यात आला. कारखान्याने सात हजार वारकऱ्यांच्या भोजनाची सोय केली होती. दरम्यान, उद्या सकाळी केंजळेवाड्यात मानाचा पादुकापूजन सोहळा पार पडल्यावर पालखी सायंकाळी कोऱ्हाळे बुद्रुकला मुक्कामी जाणार आहे.
Web Title: Sant Sopankaka Maharajs Palkhi Ceremony In Excitement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..