तुकाराम... तुकाराम...च्या नामघोषात अन्‌ टाळमृदंगांच्या गजरात देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

मास्क लावून खबरदारी
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे भाविकांची संख्या पंधरा ते वीस टक्के कमी असल्याचे संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितले. भाविकांनीही तोंडाला मास्क लावून खबरदारी घेतली. देहूरोड पोलिस, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांना सुविधा पुरविल्या.

देहू - जगाला शांती, विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा बीज सोहळा राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून आलेल्या सुमारे एक लाख भाविकांनी बुधवारी (ता. ११) याची देही, याची डोळा अनुभवला. इंद्रायणी नदीच्या काठावर भाविकांचा जनसमुदाय जमला होता. तुकाराम... तुकाराम...च्या नामघोषात अन्‌ टाळमृदंगांच्या गजरात देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटे तीनपासून मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी गर्दी केली होती. इंद्रायणी नदीत स्नान करून भाविक दर्शनासाठी येत होते. दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत होता, तर मुख्य प्रवेशद्वारातून दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात येत होता.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात चोख पोलिस बंदोबस्त होता. विठ्ठल-रुक्‍मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच, पालखी फुलांनी सजविली होती. सकाळी आठपासून भाविक आणि दिंडीकरांची संख्या वाढली. दर्शनानंतर भाविक आणि दिंड्या तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून वैकुंठगमनस्थानाकडे जात होत्या. सकाळी अकरा वाजता परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांच्या पादुका विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातून सभामंडपात आणल्या व फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवल्या. देऊळवाड्यातून सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराज पालखी वैकुंठगमनस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली. परंपरेनुसार सेवेकरी, खांदेकरी प्रकाश टिळेकर, प्रकाश पवार, तानाजी कळमकर, नामदेवनाना भिंगारदिवे, बाळासाहेब थोरात, खंडू मुसडगे, पोपट तांबे, शेटीबा कांबळे, बाळासाहेब पांडे, माउली पांडे यांनी सेवा दिली. देऊळवाड्याबाहेर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... असा नामघोष भाविक करीत होते.

रंग म्हणून फेकले ज्वलनशील पदार्थ अन् अल्पवयीन मुलगा...

उन्हातही भाविकांमध्ये उत्साह
सोहळा अनुभवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. फुलांची उधळण करत भाविकांनी दर्शन घेतले. वैकुंठगमन स्थानाकडे येणारे गावातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. पालखीपुढे संस्थान आणि कल्याणकरांची दिंडी होती. पालखीचे वैकुंठगमन स्थानाकडे आगमन होताच सर्व भाविक मिळेल त्या जागी उभे राहून सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात होते. सोहळ्यासाठी आबालवृद्ध रखरखत्या उन्हात उभे होते. जागोजागी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील वारकरीही वैकुंठस्थानी जमा होत होते. देहूतील पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे कीर्तन झाले, त्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती झाली. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष मोरे, अजित मोरे, माजी विश्वस्त सुनील महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, अभिजित मोरे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, तहसीलदार गीता गायकवाड, प्रशांत शिर्के उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant tukaram bij celebration in dehu