वारकऱ्यांनो, अखेर निर्णय झाला! माऊलींच्या व तुकोबांच्या पादुका 'अशा' नेणार पंढरीला

विलास काटे/मुकुंद परंडवाल
शनिवार, 27 जून 2020

आषाढी वारी पालखी सोहळ्यातील आळंदीतून माऊलींच्या पादुका व देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३०) पंढरपूरला आता अवघ्या वीस व्यक्तींसोबत पोलिस बंदोबस्तात शिवनेरी बसद्वारे नेण्यात येणार आहेत.

आळंदी (पुणे) : आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३०) आळंदीतून पंढरपूरला आता अवघ्या वीस व्यक्तींसोबत पोलिस बंदोबस्तात शिवनेरी बसद्वारे नेण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला मिळाले असून उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांच्यावर पादुका ने आण करण्याची जबाबदारी ठेवण्यात आली आहे.

 'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

wari 2020 : याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वारीतील लोकांना संसर्ग होवू नये, यासाठी यंदा आषाढी पायी वारी सोहळा राज्य शासनाने रद्द केला. राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली होती. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला (ता. १२) देहूत तर माऊलींच्या पादुक जेष्ठ वद्य अष्टमीला (ता. १३)आळंदीत शासनाच्या आदेशानुसार अत्यल्प वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला. त्यानंतर दोन्ही पादुका देहू आळंदीतच ठेवल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पादुका नेण्यासाठी शिवनेरी बस शासन देणार असून जास्तीत जास्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत नेण्याची परवानगी दिली आहे. सोबत पोलिसांचा बंदोबस्त दिला जाणार आहे. पादुकांसोबत साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती नसावी. तसेच कोणत्याही स्वरूपाचा आजार नसावा. पादुकासोबत येणा-या व्यक्तींची कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार यांनाही सोबत जावे लागणार आहे. त्यांच्यावर पादुका पंढरपूरला आणि पुन्हा आळंदीला आणण्याची जबाबदारी राहील. प्रवासात पादुका कोठेही थांबणार नाही याचीही दक्षता घेण्यास सांगितले. तीस जूनला सायंकाळी सहा वाजेपर्यंत पादुका पंढरपूरला पोहचणार आहेत. त्यामुळे आता पंढरपूरातील आषाढी एकादशी (ता. १) साठी आळंदी देवस्थानची तयारी सुरू झाली.

 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यालातही वीस जणांना परवानगी

देहू : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादूका येत्या 30 जूनला पंढरपूरमध्ये देहूतून मार्गस्थ होणार आहेत. यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानला शासनाने 20 जणांना पादूकांसोबत जाण्यास परवानगी दिलेली आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी दिली. गेल्या 12 जूनला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पायी वारी रद्द केली. त्यामुळे पालखी सोहळा देऊळवाड्यातच मुक्कामी राहिला. पालखी सोहळ्यातील परंपरेनुसार नियमित पुजा देऊळवाड्यातच पार पडत आहेत. येत्या 1 जुलैला आषाढी एकादशी आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने संस्थानला पत्र दिलेले असून त्यात वीस लोकांना संत तुकाराम महाराजांच्या पादूका सोबत जाण्यास परवानगी दिलेली आहे. वाहनासोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार दर्जाचा अधिकारी असावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पोलिसांची व्हायरलेस व्हॅन सोबत असणे आवश्यक आहे. 30 जूनला पादुका रात्री अकरा वाजता पंढरपूर येथे पोचतील अशी दक्षता घ्यावी. वाहनाचा प्रस्थान ठिकाण ते पंढरपूरपर्यतचा प्रवासाचा मार्ग विभागीय आयुक्त व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा. तसेच पादुका असलेले वाहन रस्त्यात कोठेही दर्शनासाठी थांबणार नाही, अशा अटी शासनाने घातलेल्या आहेत. पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे यांनी सांगितले. शासनाच्या आदेशाचे पालन करत संत तुकाराम महाराजांच्या पादुका 30 तारखेला पंढरपूरकडे नेण्यात येणार आहेत. त्यासोबत 20 जण असणार आहेत. त्यात संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष आणि पालखी सोहळ्यातील सेवेकरी यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant Tukaram maharaj and Mauli paduka will be taken from Alandi to Pandharpur by Shivneri bus.