देहूत बीजसोहळ्यासाठी वैष्णवांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

असा असेल बीज सोहळा

  • पहाटे तीन - मुख्य देऊळवाड्यात काकडआरती
  • पहाटे चार - ‘श्री’ पूजा, शिळा मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्त मंडळ, वंशज, वारकरी
  • पहाटे साडेचार - विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात पूजा
  • सकाळी सहा - वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
  • सकाळी दहा - पालखी प्रस्थान वैकुंठगमन स्थान मंदिराकडे मार्गस्थ
  • सकाळी दहा ते बारा - वैकुंठगमन सोहळ्यावर देहूकर महाराजांचे कीर्तन
  • दुपारी साडेबारा - वैकुंठगमन स्थानाहून पालखीचे मुख्य देऊळवाड्यात आगमन
  • रात्री सात - पारंपरिक फड आणि दिंड्यांची कीर्तने

देहू - जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीजसोहळा बुधवारी (ता. ११) होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येथे दाखल झाले आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, भाविकांना अधिकाधिक सेवासुविधा देण्यासाठी संस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाची युद्धपातळीवर लगबग सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देहूत विविध भागांतून दिंड्या दाखल झाल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, संजय महाराज मोरे म्हणाले, की संस्थानने मुख्य देऊळवाडा, वैकुंठगमन स्थान येथील मंदिराची विद्युत रोषणाई, रंगरंगोटी केली आहे. मंदिरालगतच्या परिसरात स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी नियुक्त केले आहेत. मुख्य देऊळवाड्यात ३२ तर कॅमेरे बसविण्यात आले असून, वैकुंठगमन स्थान मंदिर परिसरातही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. बुधवारी (ता. ११) पहाटे बीजसोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल.

देहू ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील तसेच नदीचा घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. माळवाडी, देहू, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात औषध फवारणी केली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी २४ तास पाणी व्यवस्था आणि टॅंकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. पीएमपीएलच्या बससाठी गावाबाहेर वाहनतळ उभारला आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने चोवीस तास वीजपुरवठा देण्यासाठी नियोजन केले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चोविस तास वैद्यकीय सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant tukaram maharaj bij sohala celebration