
पुण्यातील लोहगाव विमानतळाचे संतोष ढोके नवे संचालक
पुणे : लोहगाव विमानतळाचे नवे संचालक म्हणून संतोष ढोके यांनी नुकताच पदभार स्वीकारला. विमानतळ विस्तारीकरणाच्या सुरू असलेल्या कामाला गती देतानाच प्रवासीकेंद्रीत सुविधांची वाढ करण्यावर भर असेल, असे ढोके यांनी स्पष्ट केले. ढोके २०१९ ते २१ दरम्यान श्रीनगर विमानतळाचे संचालक होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्यांची पुण्यात बदली केली आहे. ढोके यांनी पदभार स्वीकारला आहे. पुणे विमानतळाचे मावळते संचालक कुलदीपसिंग यांची श्रीनगर विमातनळाचे संचालक म्हणून बदली झाली आहे.
हेही वाचा: पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध
पदभार स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ढोके म्हणाले, ‘‘पुणे हे मोठे शहर आहे, या शहरात काम करण्याचा आनंद आहे. कोरोनापूर्व काळात पुणे विमानतळावरून प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करीत. आता विमानांची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी संख्याही घटली आहे. ती पूर्ववत करण्याचा प्रयत्न असेल. तसेच विमानतळ विस्तारीकरणाच्या सुरू असलेल्या कामाला गती देणार असून प्रवासी केंद्रीत सुविधांवरही वाढ करण्यावर भर असेल.’’ पुणे आणि दक्षिण भारतातील बंगळुरू, हैदराबाद येथील शहरांसाठीच्या विमानाच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: शेततळ्यासाठी नित्कृष्ट दर्जाचा कागद; शेतकऱ्याचा कंपनीला दे धक्का
मध्य प्रदेशातील इंदूर येथील ढोके रहिवासी आहेत. १९९४ मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणात रुजू झाले. इलेट्रॉनिक्स ॲंड टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यांनी बी. टेक. केले आहे. तसेच इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रोफेशनल (आयएपी)हा अभ्यासक्रमही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. विमानतळ संचालक म्हणून ढोके यांनी या पूर्वी बडोदा, रायपूर येथेही काम केले आहे. कुलदीपसिंग यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे विमानतळाच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता.
Web Title: Santosh Dhoke New Director Of Lohgaon Airport In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..