‘कमवा-शिका’तून घडला 'आयएएस ऑफिसर', आता कारगिलची जबाबदारी

‘कमवा-शिका’तून घडला 'आयएएस ऑफिसर', आता कारगिलची जबाबदारी

पुणे : शिकण्याची ऊर्मी असेल तर परिस्थिती आड येत नाही, ही उक्ती मेळघाटातल्या संतोष सुखदेवे या युवकाने सिद्ध करून दाखवली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना ‘कमवा आणि शिका’ योजनेतून घडलेल्या संतोषने कारगिलच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. अमरावतीच्या आदिवासी बहुल भागातील संतोषच सगळंच शिक्षण सरकारी शाळांतून झालं अन तो ‘आयएएस’ झाला.  

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील नारवाटी हे संतोषचे मूळ गाव. जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे धडे गिरविल्यावर संतोष अमरावतीच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये पोचला. बारावीनंतर पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी त्याने मिळविली. त्यानंतर दीड वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात देशांमध्ये ५४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. जम्मूमध्ये उपविभागीय दंडाधिकारी पदावर काम केल्यानंतर त्याची नुकतीच कारगिलच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘सकाळ’शी बोलताना संतोषने त्याचा ‘मेळघाट ते कारगिल़’ हा प्रवास उलगडून दाखवला.

शेतकरी कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना संतोषला त्याच्या आईने अभ्यासाचे संस्कार दिले आणि तो त्या वाटेवर चालत राहिला. त्याची हुशारी बघून प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी जवाहर नवोदय विद्यालयासाठी त्याचा अर्ज भरला. सहावी ते बारावी तेथे त्याचे शिक्षण झाले. संतोषचा गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक कायम वरती राहिला. बारावीनंतर ‘सीओईपी’मध्ये आल्यावर शिष्यवृत्तीमुळे त्याला आर्थिक पाठबळ मिळालं. महाविद्यालयात असताना पहिल्या वर्षी त्याला वसतिगृहात प्रवेश मिळालं नाही, तेव्हा त्याच्या मदतीला धावून आली ती विद्यार्थी सहाय्यक समिती. या समितीच्या गोखलेनगर वसतिगृहात एक वर्ष राहिल्यावर दुसऱ्या वर्षी कॉलेजच्या वसतिगृहात त्याला प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये सलग चार वर्षे ‘कमवा आणि शिका’ या योजनेमध्ये संतोषने काम केलं, त्या आधारावरच अभियांत्रिकीची पदवी त्याने विशेष प्रावीण्य दाखवत मिळविली. 

...अन् आनंद गगनात मावेनासा झाला

परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा फोन त्याने घरी केला तेव्हा, कोणती परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे, हे आईला समजले नाही. पण सरकारी नोकरी मिळाली आहे, इतकंच तिच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने जिल्हाधिकारी झालो आहे, असे सांगितल्यावर आई-बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संतोषला पहिले पोस्टिंग जम्मू विभागात उपविभागीय दंडाधिकारी म्हणून माहूरमध्ये मिळालं अन आता तो कारगिलमध्ये पोचला.

माझा प्रवास अदभूत आहे, असे मला वाटत नाही. आईच्या संस्कारांमुळे अभ्यासाची गोडी लागली. शाळेतील शिक्षकांनीही पुढच्या वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षणादरम्यान माझ्या सवयी मर्यादित ठेवल्या होत्या, त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेतच माझे शिक्षण झाले अन त्याचे समाधान आहे.

- संतोष सुखदेवे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com