
‘संतुलन गर्भसंस्कार’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पुणे - ‘संतुलन आयुर्वेद’चे संस्थापक,‘पद्मश्री’ने सन्मानित ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी देण्यात येणाऱ्या ‘गर्भसंस्कार पुरस्कारा’चे वितरण कार्ला येथे शानदार कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आले.
कार्यक्रमास प्रसिद्ध निरुपणकार, गीता आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासिका धनश्री लेले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सोबत ‘संतुलन आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ‘संतुलन आयुर्वेद’च्या संचालिका डॉ. मालविका तांबे, सीनिअर फिजिशियन डॉ. भाग्यश्री झोपे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी ‘संतुलन आयुर्वेद’तर्फे नामांकने मागविण्यात आली होती. केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातूनही यासाठी नामांकने आली होती.
विकासाचे सर्व टप्पे अत्यंत व्यवस्थितपणे पार करणाऱ्या गोड, हुशार आणि हसऱ्या, एक वर्ष आठ महिन्याच्या कु. देवर्श सुद्धीता मंदार भोसले या बालकाला ‘गर्भसंस्कार पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. तसेच शुभ्रा प्रांचाल तुषार शिंदे, ईशा मयूरी गुरूनाथ निकते आणि मिराया ऋचा सदाशिव सप्रे यांना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गौरवचिन्ह, प्रशस्तिपत्रक, चांदीची वाटी-चमचा असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालकांना प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या.
पवार म्हणाले, ‘‘आई-वडील मुलांना स्वेच्छेने परदेशात पाठवितात. परंतु, ग्रामीण आणि शहरी भागात अशी मुले आई-वडील गेल्यानंतर क्रियाकर्मासाठी देखील परत येत नाहीत, अशी लाखो उदाहरणे आहेत. मुलांना जन्म दिल्यानंतर आपण पुन्हा गुलामी करण्यासाठी त्यांना परदेशात पाठवितो, याचा विचार पालकांनी करायला हवा. पाल्य संस्काराची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यासाठी आपण वेळ द्यायलाच हवा. सध्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत अनेक अडचणी असून त्याला सामोरे जाण्यासाठी रामबाण औषध म्हणजे श्रीगुरुजींनी सुरु केलेला उपक्रम लाइफ इन बॅलन्स.’ ‘संतुलित जीवन कसे जगायचे’, याचा कानमंत्र श्रीगुरुजींनी दिला आहे, आपण तो अंगीकारण्याची गरज आहे.’’
पालकांना मार्गदर्शन करताना लेले म्हणाल्या,‘‘पालकांच्या विचारांचे प्रतिबिंब मुलांच्या मनावर उमटत असते. त्यामुळे सकारात्मक विचारांची पेरणी मुलांच्या मनावर करणे आवश्यक आहे. संस्कार माणसाला स्थिती सुधारायला मदत करतात. मुलांना चांगला नागरिक म्हणून घडविण्यासाठी आपण संस्कार दिले पाहिजेत.’
डॉ. मालविका तांबे यांनी गर्भसंस्कार पुरस्कारामागची भूमिका, तसेच गर्भसंस्कारांची आवश्यकता याबाबत उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. सुनील तांबे यांनी ‘मुलांच्या संगोपनात वडिलांची भूमिका काय असावी’ या याबद्दल सांगितले. तर, ‘स्त्रीआरोग्य आणि गर्भसंस्कार’ याबाबत डॉ. भाग्यश्री झोपे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा तावडे यांनी केले. कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागातून पालक आपल्या मुलांना घेऊन अतिशय उत्साहाने उपस्थित होते.
मुलांची प्रगती आणि विकास हा केवळ चांगले गुण, चांगली नोकरी आणि व्यवसाय यातच असल्याचे मानून केवळ त्यासाठीच मुलांना घडविणारी सध्याची शिक्षण व्यवस्था आहे. परंतु, दुर्दैवाने या शिक्षण व्यवस्थेत मुलांमध्ये विवेकबुद्धी विकसित होण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. मनावरील ताबा आणि संतुलन राखण्याचे मार्गदर्शन शिक्षण व्यवस्थेतून मिळत नाही, म्हणूनच संस्कार महत्त्वाचे आहेत.
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह.
संतुलन हा वटवृक्ष असून ‘गर्भसंस्कार’ ही त्याची एक पारंबी आहे. संस्काराची रुजवण ही गर्भधारणेच्या पूर्वीपासूनच व्हायला हवी. आज पर्यंत हजारो आई वडिलांनी वंध्यत्व निवारणासाठी व मुलांच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने गर्भधारणेपूर्वी संतुलन पंचकर्म करवून घेतले आणि त्याचे अप्रतिम परिणाम त्यांना [ पाहायला मिळत आहेत. उज्ज्वल भवितव्याकरिता व समाजाला चांगले योगदान करू शकेल अशी भावी पिढी हवी असेल तर त्यांच्यामध्ये सकारात्मकता येणे गरजेचे आहे. त्याकरिता आयुर्वेदीय गर्भसंस्काराचे पालन करणे हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील प्रवासासाठी आई - वडील , कुटुंब , शिक्षक तसेच समाजाची पण जबाबदारी आहे की मुलांमध्ये चांगले संस्कार रुजू होतील.
- डॉ. मालविका तांबे, संचालिका - संतुलन आयुर्वेद.
आपले मुलं हे केवळ हुशारच नसावे तर, त्याचा समाजासाठी उपयोगही व्हायला हवा अशी आई म्हणून अगदी सुरुवातीपासूनच माझी धारणा होती. बाळाची वाढ, त्यात विकसित होणारी बुद्धिमत्ता, हुशारी त्यासाठी मला ‘संतुलन गर्भसंस्कार'' खूप उपयुक्त ठरले. प्रत्येकवेळी मला मार्गदर्शन मिळत गेले आणि त्याचा मला खूप फायदा झाला. संतुलन गर्भसंस्कारातून माझ्या मुलीमध्ये संस्कार आपोआप येत गेले आणि तिचा चांगल्याप्रकारे विकास होत आहे.’’
- प्रांचाल शिंदे ( पुरस्कार प्राप्त कु. शुभ्रा शिंदे हिची आई).
Web Title: Santulan Garbha Sanskar Award Distribution Ceremony Done
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..