झोपडीतल्या सारिकाला जिंकायचंय; पण...

झोपडीतल्या सारिकाला जिंकायचंय; पण...

‘खेलो इंडिया’साठी निवड; पैशाअभावी मैदान सोडावे लागण्याची भीती
कडूस - भुवनेश्‍वर (ओडिसा) येथे खेळल्या जाणाऱ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेड तालुक्‍यातील पाईटच्या रौधळवाडी येथील सारिका प्रभाकर शिनगारे ही घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे स्पर्धेसाठीचा आवश्‍यक खर्च भागवू शकत नाही. त्यामुळे ती खेळ सोडून देण्याच्या विचार करत आहे. शालेयस्तरापासून राष्ट्रीयस्तरापर्यंतच्या शेकडो वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत दीडशेपेक्षा जास्त चषक मिळविलेल्या या गुणी खेळाडूला आर्थिक मदतीची गरज आहे.

सारिका ही सध्या राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू  महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. आठवीत असताना तिचे पितृछत्र हरपले. तिच्या कुटुंबीयांना जमीनही नाही. मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रौधळवाडीत भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील एका साध्या झोपडीत आई आणि भावाबरोबर ती राहते. शालेय जीवनापासून तिला वेटलिफ्टिंगची आवड आहे. तिने आतापर्यंत शेकडो महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. स्पर्धांमधील चमकदार कामगिरीची प्रशस्तिपत्रके आणि चषकांचा झोपडीत खच पडला आहे. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत तिने दोनदा रौप्यपदक पटकावले आहे. ग्रामीण राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात तिचा समावेश होता. पुणे व पिंपरी चिंचवड महापौर चषकावर तिने नाव कोरले आहे. असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिचा एकदा दुसरा; तर एकदा प्रथम क्रमांक आला आहे. पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने ब्राँझ पदक पटकावले. तिरुनवेल्ली (तमिळनाडू) येथे डिसेंबरमध्ये झालेल्या अखिल भारतीय (राष्ट्रीयस्तर) आंतरविद्यापीठ स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात तिने तृतीय क्रमांक पटकावला. आता भुवनेश्‍वर (ओडिसा) येथील खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशासाठी खेळण्याची तिची जिद्द आहे. आतापर्यंत तिला वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलचे बिहारीलाल दुबे यांनी मोलाचे सहकार्य केले. दुबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुटीच्या काळात तिच्या मोफत मार्गदर्शनासह आहार, निवास व सरावाचा खर्च उचलला आहे.

...तर खेळ सोडण्याचा विचार
या नवोदित खेळाडूचे भवितव्य उज्ज्वल आहे. परंतु, सकस आहार, सराव व अन्य खर्च भागवण्यासाठी तिची घरची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे ती खेळ सोडून देण्याच्या विचारात आहे. खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या या ग्रामीण, दुर्गम भागातील उमलणाऱ्या गुणी व जिद्दी खेळाडूला आर्थिक बळ देण्याची गरज आहे. तिच्या पालकत्वासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे.

मदत करण्यासाठी खाते क्रमांक  
 नाव - सारिका प्रभाकर शिनगारे
 बॅंक - बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा - पाईट (ता. खेड) 
 खाते क्रमांक - ६०१४६८१०५४७ 
 IFSC कोड  MAHB००००९९२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com