
पुणे : प्रत्येक श्वासागणिक अत्यवस्थ होणाऱ्या सत्तरीतील महिलेच्या उपचारांसाठी तिचे नातेवाईक मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून वणवण फिरत होते. मेडिकल हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातील चार खासगी रुग्णालयांचे दरवाजे ते जीवाच्या आकांताने ठोठावत होते. पण, एकाही रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनंतर ससून रुग्णालयाची दरवाजे या रुग्णांसाठी उघडले गेले. त्या वेळी सकाळचे सहा वाजले होते.
लष्कर भागातील 70 वर्षांची महिलेला गुरुवारी रात्री त्रास सुरू झाला. त्यांना श्वास घेता येईना, रक्तदाब वाढलेला. तिच्या नातेवाईकांनी तिला सुरवातीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. पण, तेथे जागा नसल्याने रुग्णाला दाखल करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या रुग्णालयाने आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद केल्याचे सांगितले. तिसऱ्या आणि चौथ्या रुग्णालयांनीदेखील रुग्णाला दाखल करून घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
शहरातील या बड्या चार रुग्णालयांनी रुग्णावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर नातेवाईकांसमोर ससून रुग्णालयाशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे ते पहाटे ससून रुग्णालयात आले. मात्र, रुग्णाला कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना उपचारासाठी नवीन अकरा इमारतीमधील वॉर्डमध्ये दाखल करणे अपरिहार्य होते. मात्र, तेथे एकही जागा नव्हती. अखेर नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला.
या कार्यालयाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडून वस्तूस्थिती जाणून घेतली. पण, हा संवाद होत असतानाच ससून रुग्णालयातील कोरोनाच्या वॉर्डमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या खाटेवर तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले.
का वाढतोय ससून रुग्णालयातील मृत्यूदर
ससून रुग्णालयात आतापर्यंत कोरोनामुळे 50 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील वाढता मृत्यूदरामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली होती. मात्र, इतर खासगी रुग्णालये अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. अशा वेळी ससूनशिवाय अन्य रुग्णालयांचा पर्याय नातेवाईकांपुढे राहात नाही. अशा रुग्णांना दाखल करताना ते अत्यवस्थ असतात. त्यामुळे केलेल्या उपचारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाचा मृत्यू होतो, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.