'डीपी छान आहे'पासून सुरुवात; सोलापूरच्या 'त्या' ठगाकडे अनेक महिलांचे फोननंबर

टीम ई-सकाळ
Friday, 19 February 2021

योगेश पाटील ऊर्फ गणेश कारंडे या लंफग्याने २६ जानेवारीला सासवड-हडपसर रस्त्यावर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षिकेला रस्त्यात सोडून, तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व मोबाईल फोन असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

उरुळी कांचन (पुणे) Pune News : सोशल मीडियाच्या माध्यमातून सधन घरातील महिलांशी ओळख वाढवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सोलापूर जिल्हातील योगेश पाटील ऊर्फ गणेश शिवाजी कारंडे या ठगाला अटक करण्यात आलीय. लोणी काळभोर पोलिसांनी करमाळा तालुक्यातील श्रीपूर येथून त्याला अटक केली आहे. गणेश कारंडे याच्या घरात सापडलेल्या दहाहून अधिक मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली. त्यात मोबाईल फोनमध्ये अनेक सधन घरातील महिलांचे फोन नंबर, फोटो व काही व्हिडीओ क्लिप आढळून आल्या आहेत. यामुळे फक्त तोंड ओळख असलेला कोणत्याही व्यक्तीबरोबर व्हॉटस्अप, फेसबुक या सारखा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय केले योगेश पाटीलने?
योगेश पाटील उर्फ गणेश कारंडे या लंफग्याने २६ जानेवारीला सासवड-हडपसर रस्त्यावर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षिकेला रस्त्यात सोडून, तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व मोबाईल फोन असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. संबंधित शिक्षिकेला योगेश पाटील ऊर्फ गणेश कारंडे याचे खरे नाव, पत्ता अथवा व्यवसाय अथवा त्याच्या नातेवाईकांच्या बद्दल कसलीही माहिती नव्हती. केवळ सोशल मीडियामधील ओळखीवरून शिक्षिका या ठगाबरोबर जेजुरीला फिरण्यासाठी गेल्या होत्या. गणेश कारंडे याने शिक्षिकेकडील दागदागिने व रोख रक्कम घेऊन जातांना, त्यांना रस्त्यातच सोडून दिले होते.

पोलिसांशी संपर्क साधा
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर म्हणाले, 'गणेश कारंडे याने संबंधित महिलेला फसवल्याची कबुली दिली आहे. गणेश कारंडे याच्या घराची झडती घेतल्यानंतर 10 हून अधिक मोबाईल फोन सापडले. त्यात मोबाईल कंपन्यांची 20हून अधिक मोबाईल कार्ड मिळाली आहेत. गणेश कारंडे याच्याकडे आढळून आलेल्या मोबाईलमध्ये सोलापूर व पुणे जिल्ह्यातील अनेक महिलांचे मोबाईल नंबर व काही फोटोही आढळून आले आहेत. गणेश कारंडे हा सधन घरातील महिलांच्या बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तसेच लैंगिक अत्याचारानंतर कारंडे संबधित महिलांचे दागदागिने, मोबाईल व महिलांच्याकडे असलेली रोख रक्कम घेऊन फरार होत होता. गणेश कारंडे याने अनेक महिलांना फसवले असण्याची शक्यता आहे.' अशाप्रकारे कोणाची फसवणुक झाली असल्यास, संबधित महिलांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधावा असेही आवाहन राजू महानोर यांनी केले आहे.

आणखी वाचा - पुण्यातली कॉलेज पुन्हा बंद होणार?

'डीपी छान आहे' पासून होते सुरुवात
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, 'डिपी छान आहे, तुम्ही छान दिसता, अशा भावनीक कमेंटला अनेक महिला फसतात. समोरच्याची पूर्ण माहिती नसण्याबरोबच, केवळ तोंड ओळख असतानाही, सोशल मीडियात स्वतःचे फोटो अथवा घरगुती व्हिडोओ टाकतात. मागील काही वर्षांपासून 'सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. 'मॅट्रिमोनिअल साइट, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून महिलांची फसवणूक होते. त्यामध्ये शाळकरी मुलींपासून ते प्रौढ महिलांचा समावेश आहे. अनेकदा गंभीर चूक घडली असल्याचे समजून महिलांकडून माहिती लपविली जाते. महिलांनी माहिती दिल्यास या गोष्टींना आळा घालणे शक्य होऊ शकते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saswad women teacher yogesh patil social media chat loni kalbhor police