

साताऱ्यात दोन दिवस वाहतूक बदल
गणेश विसर्जनासाठीचा निर्णय; वाहनतळांसह इतरही उपाययोजना
सातारा, ता. २२ : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २४) सकाळी दहापासून शनिवारी (ता. २६) सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक सुरळीत राहण्यासह गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले असून, त्याची नोंद घेत पोलिस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
परंपरेनुसार साताऱ्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन होते, तर इतर मंडळांच्या मूर्तींचे अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जन होते. या दोन्ही दिवशी शहरातील विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे शहरातील मिरवणूक मार्गासह इतर भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका, पोलिस वाहने, अग्निशामक दलाच्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.
.............
या मार्गावर पार्किंगला मनाई
मिरवणूक मार्गावरील राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक, राधिका चौक, बुधवार नाका ते विसर्जन तलाव या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
................
या मार्गांवर वाहतूक बंद
राजपथावरील कमानी हौद- देवी चौक- मारवाडी चौक- मोती चौक या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद राहणार आहे. कमानी हौद ते शेटे चौक, शेटे चौक-मोती चौक- एमएसईबी कार्यालय- राधिका टॉकीज चौक- बुधवार नाका विसर्जन तलाव- आंदेकर चौक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. याचबरोबर प्रतापगंज पेठेतील स्टेट बँक ते डीसीसी बँक, मोती तळे या मार्गावरील, तसेच शाहूपुरी पोलिस ठाणे ते बुधवार नाका या मार्गावरही वाहतूक बंद राहणार आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग हलकी, तसेच अवजड वाहनांसाठी बंद राहील. त्याचप्रमाणे बोगदा- समर्थ मंदिर ते शाहू चौक हा मार्ग एसटी बससह सर्व हलक्या व अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. मोळाचा ओढा येथून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी महानुभाव मठ, करंजे नाका, भूविकास चौक हा मार्ग ठेवण्यात आला आहे.
................
परळी, कासकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
शहरातून परळी खोरे, तसेच कास पठाराकडे जाणारी- येणारी वाहने गोडोली नाका, शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, शेंद्रे- सोनगाव फाटा, बोगदा या मार्गाने वळविण्यात येणार आहेत. कास- यवतेश्वर, तसेच सज्जनगड, सोनगाव फाटामार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनीही याच मार्गाचा वापर करावा.
..........
वाहनतळ
मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी तालीम संघ, तसेच कोटेश्वर मैदानात वाहनतळ करण्यात आले आहेत. याचबरोबर मिरवणूक मार्गावरील रहिवाशांनी आपली वाहने त्याचठिकाणी लावणे बंधनकारक आहे.
...................................
विसर्जनदिनी प्रीतिसंगम उद्यान बंद
कऱ्हाड : गणेशमूर्ती विसर्जनासाठी कऱ्हाडच्या प्रीतिसंगम उद्यानासमोरील कृष्णा घाटावर होणारी गर्दी आणि विसर्जन मार्गावरून जाणाऱ्या मिरवणुकांची वर्दळ लक्षात घेऊन पालिकेने प्रीतिसंगम उद्यान २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी सहापासून शनिवारी (ता. २६) सकाळी सहापर्यंत उद्यानात नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही.
...................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.